अमेरिकेमध्ये जो बायडेन यांनी शपथ घेतली. बायडेन यांनी शपथ घेताच चीनने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांच्या टीमवर प्रतिबंध लादले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममध्ये माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ, माजी एनएसए रॉबर्ट ओब्रायन यांच्यासह ट्रम्प यांच्या सर्व मंत्र्यांवर बंदीची घोषणा केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेच्या काही चीन विरोधी स्वार्थी राजकारण्यांनी आपले राजकीय हीत जोपासण्यासाठी चीन विरोधी भूमिका घेतली होती. यामुळे अमेरिकी आणि चीनच्या लोकांचे हित दुर्लक्षित करण्यात आले. अमेरिकेच्या या नेत्यांनी जाणूनबुजून अशी पाऊले उचलली ज्याने चीनच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप होत होता. या पावलांमुळे चीनचे लोक अपमानीत झाले आणि दोन्ही देशांच्या संबंधांना नुकसान पोहोचले. चीन सरकार पूर्णपणे देशाची संप्रभुता, सुरक्षा आणि हितांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
चीनने अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ, रॉबर्ट ब्रायन आणि जॉन बॉल्टन यांच्यासह ट्रम्प सरकारमध्ये असलेल्या 8 लोकांवर प्रतिबंध लावले आहेत. यानुसार हे नेते, त्यांचे कुटुंबीय चीन, हाँगकाँग आणि मकाऊला जाऊ शकत नाहीत. तसेच हे नेते, त्यांच्याशी जोडलेल्या संघटना आणि कंपन्या यापुढे चीनसोबत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू शकणार नाहीत, असेही यामध्ये म्हटले आहे.
पॉम्पिओ यांनी शेवटच्या दिवशी वीगर मुस्लिमांवरून चीनवर कठोर टीका केली होती. चीनने वीगर मुस्लिमांचा नरसंहार केला आहे. माझ्या माहितीनुसार चीनकडून हा नरसंहार आजही सुरुच आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी या मुस्लिमांना सुनियोजित पद्धतीने संपवत आहे, असे ते म्हणाले होते. महत्वाचे म्हणजे बायडन यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होणारे अँटोनी ब्लिंकन यांनीदेखील पॉम्पिओंच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे.
बायडेन नवे राष्ट्राध्यक्षव्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. दुपारी १२च्या ठोक्याला अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती. २५ हजार सुरक्षारक्षकांच्या गराड्यात शपथविधी सोहळा झाला. कॅपिटॉल हिलवर अलीकडे झालेल्या हल्ल्याची काळी किनार सोहळ्याला होती.