ऑनलाइन लोकमतपेइचिंग, दि. 27 - ब्रह्मपुत्रेच्या पाण्याच्या वाटपावर ढाका येथे होणा-या चर्चेत चीन बांगलादेशला भारताविरोधात भडकावण्याच्या तयारीत आहे. ब्रह्मपुत्रा नदी भारताच्या उत्तर-पूर्व दिशेनं वाहत जाऊन बांगलादेशातून प्रवास करते. तसेच चीन ब्रह्मपुत्रेच्या पुढे जाऊन सिल्क रोड कार्यक्रमही राबवण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून चीन इतर सीमावर्ती देशांशी संपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून, भारत या प्रकल्पासाठी अनुत्सुक आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनुसार, भारत ब्रह्मपुत्रेच्या पाणीवाटपावरून चीनसोबत करार करू इच्छितो. मात्र बांगलादेशनेही भारताकडून स्वतःच्या अधिकारांचं संरक्षण केलं पाहिजे. चीनला ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावरून भारताविरोधात बांगलादेशचा पाठिंबा हवा आहे. यारलुंग जांग्बोवर चीननं बांधलेल्या धरणाबाबत भारत सतर्क असून, त्याप्रमाणेच भारताचीही ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्याची मनीषा आहे. त्यामुळे बांगलादेशातील पाण्याच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे, असं ग्लोबल टाइम्सनं प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटलं आहे. चीन सरकारने ब्रह्मपुत्रेच्या पाणीवाटपाच्या चर्चेदरम्यान सिल्क रोड प्रकल्पाचा वापर करावा, कारण या प्रकल्पाचा एक भाग चीन आणि पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या इकॉनॉमिक कॉरिडॉर(सीपीईसी) आहे. चीन, व्हिएतनाम, थायलंड, लाओस आणि कंबोडियामध्ये सीमेजवळून वाहणा-या नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात असलेल्या लाकांग-मेकांग कोऑपरेशन मेकॅनिज सारखं मॉडल भारतासोबत ब्रह्मपुत्रेच्या पाण्यासाठी अवलंबले पाहिजे, असंही ग्लोबल टाइम्समधून मत मांडण्यात आलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून चीन नेपाळसोबत व्यावहारिक मित्रता वाढवून भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.
ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावरून चीन भारताविरोधात करणार बांगलादेशचा वापर
By admin | Published: December 27, 2016 5:08 PM