बिजिंग : भारताला लागून असलेल्या सीमेवर चीन दळणवळणाच्या सेवा मजबूत करण्यात गुंतला आहे. आता चीनने (China)पहिल्यांदाच आपल्या सैनिकांना (PLA Army) बुलेट ट्रेनमध्ये घालून सीमेवर पाठवत आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. 160 किमी प्रति तासाच्या वेगाने ही बुलेट ट्रेन तिबेटची राजधानी ल्हासाहून पीपल्स आर्मीच्या सैनिकांना घेऊन निंगची शहरात आली आहे. हे शहर अरुणाचल प्रदेशच्या सीमेच्या जवळ आहे. (China Pla Soldiers Sent To India Border by bullet train)
चीनची सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सनुसार ‘पीपुल्स लिबरेशन आर्मी’च्या नव्याने भरती झालेल्या जवानांना 4500 मीटर उंचीवरील एका अभ्यास क्षेत्रात नेण्यात आले. पीएलएशी संबंधीत असलेल्या एका वेबसाईटनुसार ल्हासा ते निंगची बुलेट ट्रेनद्वारे पहिल्यांदाच या सैनिकांना नेण्यात आले आहे. निंगची शहर हे रणनीतिक दृष्ट्या चीनसाठी महत्वाचे शहर आहे. कारण ते चीनचा डोळा असलेल्या अरुणाचल प्रदेशला लागून आहे.
चीनने नुकतेच तिबेटच्या हिमालयीन भागात वीजेवर चालणाऱ्या बुलेट ट्रेन सुरु केली होती. सिटुआन-तिबेट रेल्वे 435.5 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे ट्रॅकचे उद्घाटन कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या शताब्दी महोत्सवावेळी करण्यात आले होते. गेल्या नोव्हेंबरमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अधिकाऱ्यांना या बुलेट ट्रेनचे काम वेगाने करण्याचे आदेश दिले होते. यामुळे चेंगदू ते ल्हासा हा प्रवास 48 तासांवरून 13 तासांचा होणार आहे. सिचुआन-तिबेट रेल्वेची सुरुवात सिचुआन प्रांताची राजधानी चेंगदूवरून होणार आहे. ही रेल्वे यान, कामदोवरून तिबेटमध्ये प्रवेश करणार आहे.
नियंगची मेडोग प्रांताचे शहर आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा हिस्सा मानते. यामुळे तेथे सैन्य कारवायांमध्ये चीनने वाढ केली आहे. तसेच अनेक लढाऊ विमानांना उतरण्यासाठी तळ उभारण्यात आले आहेत. येथे मिसाईल देखील तैनात केले आहेत.