इस्लामाबाद - चीन पाकिस्तानमध्ये लष्करी तळ उभारण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनची या संदर्भात पाकिस्तानबरोबर चर्चा सुरु आहे. पाकिस्तानने परवानगी दिल्यास चीनचा हा परदेशातील दुसरा लष्करी तळ ठरेल. याआधी आफ्रिका खंडातील डिजीबाऊटी या देशात चीनने आपला पहिला लष्करी तळ उभारला आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानला फटकारले त्यावरुन भविष्यात पाकिस्तान चीनच्या अधिक जवळ जाण्याची शक्यता आहे. दोन्ही देशातील व्यापारी आणि संरक्षण संबंध अधिक दृढ होऊ शकतात. सीपीईसी प्रकल्पामुळे दोन्ही देशातील जवळीक मोठया प्रमाणात वाढली आहे. या प्रकल्पातंर्गत चीनने पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
पाकिस्तानात जिवानी बंदरावर लष्करी तळ उभारण्याचा चीनचा प्रयत्न आहे. इराणच्या चाबहारपासून हे बंदर जवळच असेल. इराण, भारत आणि अफगाणिस्तान या तिघांनी मिळून चाबहार बंदर विकसित केले आहे. चाबहार बंदरामुळे भारताचा मध्य अशियायी देशांशी व्यापाराचा मार्ग मोकळा झाला आहे. समुद्री चाच्यांविरोधातील कारवाईसाठी तैनात असणा-या आपल्या नौसैनिकांच्या सोयीसाठी आपण जिवानी बंदरावर तळ उभारत आहोत असे चीनकडून अधिकृतरित्या सांगितले जात आहे. पण चीनचा इतिहास तपासला तर चीन जे बोलतो तसा कधीच वागत नाही. समुद्रात टेहळणी क्षमता वाढवण्याचा यामागे चीनचा छुपा हेतू आहे. चीनने काही महिन्यापूर्वीच श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर 99 वर्षांच्या भाडेतत्वावर चालवायला घेतले आहे.
चाबहारचे महत्त्वचाबहार हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. चाबहारचा इतिहास ख्रिस्तपूर्व 2500 वर्षांपासूनचा असून अलेक्झांडर, मंगोलांनीही येथे सत्ता गाजवलेली होती. भारत अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतापासून चाबहार पर्यंत रेल्वेमार्ग बांधण्यात येत आहे, तसेच काबूलपासून 130 किमी अंतरावरील हाजिगाक कोळसा क्षेत्रात कोळसा उत्खननाचे हक्कही भारताला मिळाले आहेत. चाबहार-मिलाक-झारांज-दिलाराम असा रस्ता भारत बांधत असल्यामुळे अफगाणिस्तानसोबतही भारताचा व्यापार वाढणार आहे. इराण-पाकिस्तान- भारत या वायूवाहिनी प्रकल्पाचे काम रखडल्यानंतर भारत आणि इराण अरबी समुद्रातून वायू वाहिनी नेण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे पाकिस्तानला शह बसणार आहे.