बिजींग, दि. 17 - भारतीय सैन्य दल तोडीस तोड आहे हे माहित असूनही मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भारताला युद्धाची धमकी देणा-या चिनी तज्ञांची गुर्मी अजिबात कमी झालेली नाही. डोकलाममधून भारताने सैन्य मागे घेतले म्हणून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली समस्या लगेच मिटणार नाही. सैन्य मागे घेणे ही फक्त चीनकडून घालण्यात आलेली एक पूर्वअट आहे. भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले तरी, चीन सहजासहजी हा विषय सोडणार नाही. भारताने जी काही आक्रमक, चिथावणीखोर कृती केली आहे त्याची किंमत भारताला चुकवावी लागेल असे यी हायलिन यांनी ग्लोबल टाइम्सशी बोलताना सांगितले. ते चीनच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंटरनॅशनल स्ट्रॅटजीचे संचालक आहेत.
आणखी वाचा विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढसर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर इशरत जहाँ प्रकरणातील पोलीस अधिका-यांची पद सोडण्याची तयारी
भारताने चीनच्या भूमीवरुन सैन्य मागे घेतले नाही तर, चीनचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय सप्टेंबरआधीच भारताला अल्टिमेटम देईल असे चिनी लष्कराशी संबंधित असलेल्या दुस-या एका तज्ञाने सांगितले. हे अल्टिमेटम म्हणजे भारत आणि जगासाठी स्पष्ट संदेश असेल. चीन भारताला सैन्य मागे घेण्यासाठी ठराविक दिवसांची मुदत देईल. ती डेडलाईन संपल्यानंतर भारतीय सैन्य चिनी भूमीवर कायम असेल तर जे होईल त्याची संपूर्ण जबाबदारी भारताची असेल असे या तज्ञाने सांगितले. चीन शस्त्रसाठा आणि लष्करी तंत्रज्ञानात भारताला वरचढ आहे असे चिनी तज्ञांचे मत आहे. भारताच्या मागच्या काहीवर्षात रशिया आणि अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे विकत घेतली आहेत.
डोकलाममध्ये भारतीय आणि चिनी सैन्य परस्परासमोर उभे ठाकले आहे. या संघर्षाला 50 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. चीनकडून युद्धाची भाषा केली जात असली तरी, भारत आपले संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मागेच राज्यसभेत स्पष्ट केले. भारत, चीन आणि भूतानच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात, त्या ट्राय जंक्शनच्या भूभागातील परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. डोकलामचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घ्यावे असे भारताने आधीच सांगितले आहे.