ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 24 - चीनची महत्त्वाकांक्षी योजना वन बेल्ट वन रोड(OBOR)नं जमिनीवरचं राजकारण पूर्णतः बदलून टाकलं आहे. मात्र भारतानं यात सहभाग न घेतल्यानं गेल्या काही दिवसांपासून चीन भारताविरोधात आगपाखड करत आहे. आता अमेरिकाही चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी नवा कॉरिडोर बनवणार आहे.
अमेरिका चीनच्या OBORला मात देण्यासाठी दक्षिण पूर्व आशियातील दोन महत्त्वपूर्ण योजनांना पुन्हा सुरू करणार आहे. अमेरिकेच्या या योजनेत भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासन न्यू सिल्क रोडचं काम पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेची घोषणा जुलै 2011मध्ये अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी स्वतःच्या भाषणात केली होती. या योजनेसह दक्षिण आणि आग्नेय आशियाला जोडणारा इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक कॉरिडोरही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी अमेरिकेच्या प्रशासनाच्या पहिल्या बजेटमध्ये या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. न्यू सिल्क रोड हा खासगी-सार्वजनिक भागीदारी प्रकल्प असणार आहे. त्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, दक्षिण आणि मध्य आशियाचा परराष्ट्र विभागही या प्रकल्पासाठी योगदान देणार आहे. न्यू सिल्क रोड या कॉरिडोर अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारील राष्ट्रांमधून जाणार आहे. तसेच दुस-या बाजूला भारत- प्रशांत महासागरातील आर्थिक कॉरिडोर आहे. जो दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या प्रांताला जोडणार आहे. एनएसआर या प्रकल्पाचं महत्त्व वाढलं आहे. कारण अमेरिका अफगाणिस्तानमधील लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत देण्यावर ठाम आहे. क्लिंटन म्हणाल्या होत्या, वायू क्षेत्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना ऊर्जा पुरवण्यासाठी मदत करू शकतो. तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडून चांगल्या प्रमाणात संक्रमण महसूल मिळणार आहे. त्यामुळे या प्रोजेक्टचा इतर देशांनाही फायदा होणार आहे. ओबामांच्या कार्यकाळात या न्यू सिल्क रोड या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काहीसा हा प्रोजेक्ट अडगळीत पडला होता. मात्र या प्रोजेक्टला अमेरिका पुन्हा चालना देणार आहे.