नवी दिल्ली, दि. 10 - डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये रस्तेबांधणीवरुन निर्माण झालेला संघर्ष चिघळत चालला असून, चीनने डोकलाममध्ये सैनिकांची संख्या वाढवली आहे. डोकलामधील वादग्रस्त जागेपासून एक किलोमीटरच्या अंतरावर चीनने 800 सैनिकांची तैनाती केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. चीनने या भागात 80 तंबू टाकले आहेत. चीनने अजून इथे आपली पूर्ण बटालियन तैनात केलेली नाही.
संघर्ष सुरु आहे तिथे आधीपासूनच चीनने 300 सैनिक तैनात केले आहेत. सिक्कीमच्या भागात भारताचे 350 जवान तैनात आहेत. भारतीय चीनच्या बाजूला कोणतीही हालचाल होत नसल्याचे लष्कराने म्हटले आहे. भारतीय लष्कराने आपल्या तुकडयांसाठी दोन आठडयांचा ऑपरेशन अलर्ट कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबरऐवजी ऑगस्टमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैन्य समोरा-समोर उभे ठाकल्याच्या घटनेला आता 50 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत.
दरम्यान चीनच्या सरकारी मालकीच्या वर्तमानपत्रांमधून भारताला दररोज धमक्या आणि इशारे देण्याची मालिका सुरुच आहे. आता पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या लेखातून भारताला उपदेशाचा डोस पाजण्यात आला आहे. डोकलाममध्ये जो संघर्ष सुरु आहे त्यातून भारताची भूराजनैतिक महत्वकांक्षा दिसून येते. भूतानच्या संरक्षणाच्या नावाखाली भारताचे स्वत:चे महासत्ता बनण्याचे स्वप्न दडले आहे अशी टीका लेखातून करण्यात आली आहे.
डोकलामचा तिढा सोडवण्यासाठी भारताने तात्काळ आपले सैन्य तिथून मागे घ्यावे असा सल्ला देण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे डोकलाम हा चीनचा भूभाग असून तिथे भारतीय सैन्याने घुसखोरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. जूनच्या मध्यपासून दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. डोकलाम भूतानच्या हद्दीत येते पण डोकलाम आपल्या हद्दीत येते असा चीनचा दावा आहे. भारताला आशियामध्ये वर्चस्व गाजवायचे आहे. भारत चीनकडे आपल्या सुरक्षेसाठी एक गंभीर धोका म्हणून पाहतो असे लेखात म्हटले आहे. भूतानला मदत करण्याच्या नावाखाली चीनने जे पाऊल उचलले आहे त्याने फक्त चीनच्या हद्दीचेच उल्लंघन होत नाहीय तर, भूतानच्या अखंडतेला आणि स्वांतत्र्यालाही धोका निर्माण झाला आहे असे लेखात लिहीले आहे.