बीजिंग - गतवर्षी भारत आणि चीनचे सैन्य डोकलामच्य पठारावर आमनेसामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, डोकलाम येथील विवादानंतर प्रथमच चीनने तिबेटमधील हिमालयीन क्षेत्रात युद्धसराव केला आहे. चिनी सैन्याने हिमालयातील दुर्गम भागात सामान आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक, तसेच सैनिकी आणि असैनिकी मनुष्यबळाचे एकत्रीकरण करण्याचा सराव यादरम्यान करण्याच आल्याचे चीनमधील अधिकृत प्रसारमाध्यमांनी सांगितले. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यामध्ये अभ्यासकांनी चिनी सैन्याने मंगळवारी केलेल्या सरावाचे कौतुक केले आहे. तसेच सैनिकी आणि असैनिकी मनुष्यबळाची करण्यात आलेली जमवाजमव हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले आहे. तसेच हा सराव म्हणजे नव्या युगामध्ये सशक्त सेना निर्माण करण्याचे लक्ष्य गाठण्याची रणनीती असल्याचे चिनी तज्ज्ञांनी म्हटले आहे. तिबेटमध्ये हा युद्धसराव स्थानिक कंपन्या आणि सरकारच्या मदतीने करण्यात आला. या सरावाचा मुख्य उद्देश हा सैनिकी आणि असैनिकी मनुष्यबळाचे एकत्रिकरण करण्याच्या रणनीतीची अंमलबजावणी करणे हा होता. तिबेटच्या पठारावर वातावरण आणि भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल आहे. त्यामुळे येथील सैनिकांना दीर्घकाळ सामान आणि हत्यारांचा पुरवठा करणे कठीण ठरते. प्रतिकूल परिस्थितीत सैनिकांना तग धरून राहण्यास तयार करणे, साधनसामुग्रीचा पुरवठा, बचावकार्य, आपातकालीन देखरेख, रस्त्यांच्या सुरक्षेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी चिनी सैन्याने सैनिकी आणि असैनिकी एकत्रिकरणाची रणनीती अवलंबली आहे, असे चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हूआने कमांड लॉजिस्टिक सपोर्ट डिपार्टमेंटचे प्रमुख झांग वेनलोंग यांच्या हवाल्याने सांगितले आहे.
डोकलाम विवादानंतर चीनने तिबेटमध्ये प्रथमच केला युद्धसराव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 5:28 PM