कोरोनाच्या उत्पत्तीनंतर चीन पुन्हा एकदा वादात सापडला आहे. कोरोनामुळे जगभरात नाचक्की झालल्या चीनच्या कोरोना लसीमुळे नागरिकांना ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) होत असल्याचा गुप्त अहवाल चीनच्याच राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिल्याने खळबळ उडाली आहे. या अहवालाची कागदपत्रे बाहेर पडल्य़ाने चीनची लस देखील किती धोकादायक होती हे समोर आले आहे.
शी जिनपिंग यांच्यासाठी यापेक्षा मोठी लाजीरवाणी गोष्ट कोणती असू शकत नाही. अनेकांना चिनी कोरोना लसीमुळे ल्युकेमिया झाला होता, असे या अहवालात म्हटले आहे. एनएचसीने चीनच्या अधिकाऱ्यांना अनेक लस घेतलेले नागरिक ल्युकेमिया झाल्याच्या तक्रारी करत असल्याचे सांगत सतर्क केले होते. NHC ची प्रत हेबेई, लिओनिंग, सिचुआन, शांक्सी आणि इतरांसह 18 प्रांतांना पाठवण्यात आली आहे, असे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.
ल्य़ुकेमियाने ग्रस्त झालेली कुटुंबे वुई चॅटवरून आपला अनुभव शेअर करत आहेत. चीन नॅशनल हेल्थ कमिशनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या लोकांचा आवाज दाबण्यासाठी CCP ने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. चीनने या लशी परदेशांनाही मोठ्या प्रमाणावर पुरविल्याने खळबळ उडाली आहे. या देशांमधील लोकांनाही हा गंभीर साईड इफेक्ट जाणवण्याची शक्यता आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सिनोफार्म लस आणि सिनोव्हाक-कोरोनाव्हॅक कोविड-19 लसी आपत्कालीन वापरासाठी प्रमाणित केल्या होत्या. या दोन्ही लसी चिनी औषध कंपन्यांनी विकसित केल्या आहेत. नोव्हेंबर २०२१ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने जगभरात कोविड लसींचे १.५ अब्जाहून अधिक डोस निर्यात केले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.