बीजिंग: जगभरात सध्या कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत ४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. एकट्या चीनमध्ये कोरोनाची बाधा झाल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३ हजाराहून अधिक आहे. मात्र आता चीनमधील कोरोनाचा कहर आटोक्यात येताना दिसतोय. त्यामुळे बऱ्याचशा भागांमधले निर्बंध उठवले जात असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय. हुबेई प्रांतात लागू असलेले प्रवासावरील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. याशिवाय हुबेई प्रांतातल्या दोन शहरांमधील कार्यालयंदेखील सुरू होऊ लागली आहेत. हुबेईची अर्थव्यवस्था उत्पादन आणि ऑटो क्षेत्रावर अवलंबून आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेईतली परिस्थिती हळूहळू सुधारतेय. कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या हुबेईमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात दहापेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनानं परिसरात लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोना वेगानं पसरत असला, तरी चीनमध्ये तो नियंत्रणात आला आहे. गेल्या सात दिवसांत चीनमधील परिस्थिती सुधारली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानं महत्त्वाची पावलं उचलण्यात आली होती. त्याचा परिणाम आता दिसू लागलाय. वुहानची लोकसंख्या १ कोटी १० लाख इतकी आहे. वुहानमधूनच कोरोना विषाणू जगभरात पसरला. वुहानमध्ये काल सापडलेल्या कोरोना रुग्णांची नोंद राष्ट्रीय आरोग्य आयोगानं केली. हुबेई प्रांताच्या बाहेर असलेल्या मेनलँड चायनामध्ये कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळून आले. त्यातले ६ जण परदेशातून आले आहेत. या सहा जणांपैकी तिघे गुआंगडाँग, दोन जण गान्सू, तर एक जण हेनान प्रांतातला आहे. बुधवारी मेनलँड चायनामध्ये कोरोनाचे १५ रुग्ण सापडले. मंगळवारी हाच आकडा २४ इतका होता.
Coronavirus: चीनमधून मोठी बातमी; कोरोनाचा कहर आटोक्यात, नवीन रुग्णांची संख्या 'एकेरी', कार्यालयं उघडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 3:10 PM
कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या भागातील परिस्थिती सुधारली
ठळक मुद्देहुबेई प्रांतातल्या परिस्थितीत सुधारणा; कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटलीप्रशासनाकडून निर्बंध शिथिल; जनजीवन हळूहळू पूर्वपदावरकोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या परिसरातील परिस्थिती सुधारली