ऑनलाइन लोकमतगिलगिट, दि. 15 - चीनचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट वन बेल्ड वन रोडसाठी बीजिंगमध्ये शिखर बैठक सुरू असतानाच दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमधून चीन-पाकिस्तानच्या आर्थिक कॉरिडोर(CPEC)ला जोरदार विरोध सुरू आहे. या प्रोजेक्टविरोधात पाकव्याप्त काश्मीरमधून अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत. गिलगिट आणि बाल्टिस्तानमधील अनेक आंदोलकांनी CPEC बनवण्याला विरोध दर्शवला आहे. गिलगिट, हुंजा, स्कर्दू आणि गिजरमध्ये कोराकोरम स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, बलावरिस्तान नॅशनल स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, गिलगिट-बाल्टिस्थान युनायटेड मूव्हमेंट आणि बलावरिस्तान नॅशनल फ्रंटसारख्या विद्यार्थी आणि राजकीय संघटना CPECला विरोध करत आहेत. CPEC प्रोजेक्टच्या माध्यमातून गिलगिटवर अवैधरीत्या कब्जा केला जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. CPEC प्रोजेक्ट हा गिलगिट-बाल्टिस्तानच्या लाचारीचा रस्ता असल्याचं आंदोलक म्हणतायत. CPEC हा चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टचा एक भाग आहे. CPEC आणि OBORच्या माध्यमातून चीनचा गिलगिटच्या भूभागावर कब्जा करण्याचा इरादा आहे. चिनी साम्राज्यवाद थांबवा, असे फलक झळकावून संयुक्त राष्ट्राला गिलगिटमध्ये चीनच्या अतिक्रमणाला रोखण्याचं अपील केलं आहे. आंदोलकांच्या मते, गिलगिट 1948-49 पासून वादग्रस्त भूभाग आहे, चीन येथे पाकिस्तानच्या माध्यमातून अवैधरीत्या घुसखोरी करत आहे. चीन CPECच्या माध्यमातून पाकिस्तानात स्वतःच्या सैन्याला मजबूत करत आहे. चीन गिलगित-बाल्टिस्तानमध्ये स्वतःचं लष्करी स्थळ स्थापन करत आहे. चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश CPEC बनवण्यासाठी या भूभागातील लोकांना धमकावत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानंही गिलगित-बाल्टिस्तानमध्ये होणा-या मानवाधिकारांच्या उल्लंघनावरही चिंता व्यक्त केली आहे. बलुचिस्तानमध्येही पुन्हा एकदा हिंसा उफाळून आली आहे. पाकिस्तानच्या द न्यूज इंटरनॅशनलच्या मते, गेल्या 6 वर्षांत जवळपास 1000 मृतदेह विविध प्रांतातल्या वेगवेगळ्या भागात मिळाले आहेत. तसेच बॉम्बस्फोटाच्याही 80 घटना समोर आल्या आहेत. वर्ष 2016मध्ये 331 निर्दोष लोकांची हत्या करण्यात आली आहे. तर 2015 मध्ये 202 लोक मारले गेले आहेत. पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानला अनेक दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे.
चीनच्या CPEC कॉरिडोरला पाकव्याप्त काश्मीरमधून जोरदार विरोध
By admin | Published: May 15, 2017 11:24 AM