चीनमध्ये एका मागोमाग एक अनेक अधिकारी आणि मंत्री गायब होत आहेत. अशातच चीनचे माजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांचे हालहाल करून मारून टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे माजी संरक्षण मंत्री ली शांगफू यांच्यासह अनेक बडे अधिकारी देखील बेपत्ता आहेत.
गँग हे बऱ्याच काळापासून बेपत्ता होते. ते कुठे आहेत याची माहिती मिळालेली नाहीय. चीन सरकारनेही यावर काही सांगितलेले नाहीय, असे ब्रिटीश मीडियाने सांगितले आहे. शेकडो अधिकारी बेपत्ता झाल्यानंतर जिनपिंग स्टॅलिनसारखेच शिद्धीकरणाच्या मोहिमेवर असल्याचे बोलले जात आहे. द सनच्या वृत्तानुसार गँगसह माजी सुरक्षा मंत्री शांगफू यांच्यासह कित्येक हाय प्रोफाईल लोकांचा मृत्यू झाला आहे.
चीनमध्ये सुरक्षेचा स्तर सध्या खूप कठोर करण्यात आला आहे. अनेक कंपन्या देशोधडीला लागल्या आहेत. अशात चीनमध्ये काय घडतेय हे नेहमीप्रमाणे लपविले जात आहे. चिनी अधिकारी गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच जिनपिंग यांच्यावर निर्घृण कृत्ये केली जात असल्याचे आरोप लावले जात आहेत.
जिनपिंग हे त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याप्रमाणे फसवणूक होण्याच्या भीतीने लोकांविरुद्ध धोकादायक पावले उचलत आहेत. चीनचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री किन गँग आणि ली शांगफू यांना काढून टाकणे आणि गायब होणे ही दोन सर्वात हाय प्रोफाइल उदाहरणे आहेत. हे दोघेही या वर्षाच्या सुरुवातीला निवडून आले होते त्यानंतर लगेचच ते बेपत्ता झाले. किन यांची जुलै 2021 मध्ये अमेरिकेतील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अवघ्या 18 महिन्यांनंतर त्यांना परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते.