काही वर्षांसाठी चीनची जगातील सर्वात मोठी कंपनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे बेपत्ता झाले होते. आता चीनचे परराष्ट्रमंत्री गेल्या महिनाभरापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचे अमेरिकी टीव्ही अँकरशी प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे ती अँकरही गायब झाली आहे. यामुळे नेमके चाललेय काय, असा सवाल आता उठू लागला आहे.
चीनचे मंत्री किन गांग यांना गेल्या २५ जूनपासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. गांग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे अत्यंत जवळचे आहेत. परराष्ट्र मंत्री असताना आणि स्टेट काऊंसेलर पदावर असताना त्यांची प्रगती दुप्पट वेगाने झाल्याचेही बोलले जात आहे. आता ते रहस्यमयी पद्धतीने गायब झाल्याने त्याचीही चर्चा जोरदार सुरु झाली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने देखील यावर काही बोलण्यास नकार दिला आहे. मंत्री कुठे आहेत, हे आपल्याला माहिती नाही, असे प्रवक्त्याने सांगितले आहे. सुरुवातीला ते आजारी असतील असा अंदाज होता, परंतू सोशल मीडियावरील चर्चांनी अमेरिकी अँकरशी नाजूक संबंधांवर प्रकाश टाकला आहे.
चीनमध्ये जन्मलेल्या आणि केंब्रिजमध्ये शिकलेल्या या टीव्ही अँकरने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका मुलाला जन्म दिला होता. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वय 57 वर्षे असून ते यापूर्वी अमेरिकेत चीनचे राजदूत राहिले होते. इंडोनेशियामध्ये 25 जून रोजी आसियान देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार होते, मात्र ते गेले नव्हते.
अमेरिकन न्यूज अँकर फू शियाओटियनने गेल्या वर्षी एक ट्विट करत तिला एक मुलगा असल्याचे म्हटले होते. त्याचे वडील हे चिनी असल्याचेही तिने म्हटले होते. अमेरिकेतील चीनचे राजदूत असल्यापासून हे दोघे एकमेकांना ओळखत होते.