नवी दिल्ली: अमेरिकेविरुद्धच्या व्यापार युद्धाचा मोठा फटका चीनला बसला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या सकल वार्षिक उत्पन्न वाढीचा वेग मंदावला आहे. चीनच्या जीडीपी वाढीचा वेग ६.२ टक्क्यांवर घसरला आहे. त्यामुळे चीनच्या जीडीपीनं गेल्या ३० वर्षांमधील निच्चांक गाठला आहे. चिनी दैनिक साऊथ चायना मॉर्निंगनं चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चिनी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ६.२ टक्के असल्याचं म्हटलं. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हाच वेग ६.४ टक्के होता, असंदेखील वृत्तपत्रानं म्हटलं आहे. त्यासाठी नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीचा संदर्भ देण्यात आला आहे. चीनचे प्रीमियर ली केकियांग यांनी देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग ६ ते ६.५ टक्के राहील, असा अंदाज मार्चमध्ये व्यक्त केला होता. त्यानुसार चीनच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग योग्य असल्याचं म्हटलं. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंध सध्या ताणले गेले आहेत. दोन्ही देशातील व्यापार युद्धाचा परिणाम चिनी अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांवरील शुल्क वाढवलं आहे. त्यामुळे चिनी उत्पादनं महाग झाली आहेत. जूनमध्ये निर्यातीत १.२ टक्क्यांची घट झाल्याचं चीन सरकारकडून गेल्या शुक्रवारी सांगण्यात आलं होतं.
ड्रॅगनला तडाखा; चीनचा विकास दर ३० वर्षांतील निच्चांकी पातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 3:18 PM