लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात २०१७ मध्ये सिक्कीमच्या पूर्वेस असलेल्या भूतानचा भाग असलेल्या डोकलाम पेचप्रसंगानंतर आता चीनने त्याचे व्यूहरचनात्मक उद्देश बदलल्याचे दिसते.
चीनने गेल्या तीन वर्षांत भारतीय सीमेजवळ हवाई तळ, हवाई संरक्षण ठिकाणे आणि हेलिपोर्टस्ची संख्या तब्बल दुप्पट केली आहे. चीनने केलेल्या या लष्करी विस्ताराचा तपशील उपलब्ध झाला आहे. ‘स्ट्रॅटफॉर’ या आघाडीच्या जागतिक जिओपोलिटिकल गुप्तचर संस्थेने याबाबत अहवाल तयार केला आहे. मात्र, तो अद्याप जाहीर झालेला नाही.
चीनने त्याच्या लष्कराच्या पायाभूत सुविधांची भारताला लागून असलेल्या सीमेवर केलेल्या उभारणीची वेळ ही लडाख प्रकरण सुरू व्हायच्या नुकतीच आधीची होती. यातून हे सूचित होते की, सीमेवरून निर्माण झालेला तणाव चीनने फार मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रयत्नांचाच भाग होता, असे स्ट्रॅफफॉरचे वरिष्ठ जागतिक विश्लेषक सिम टॅक यांनी म्हटले. टॅक यांनीच हा अहवाल तयार केला आहे. विशेष म्हणजे चीनच्या या लष्करी पायाभूत सुविधा अजून पूर्ण व्हायच्या आहेत. त्यांचा विस्तार आणि बऱ्याच लष्करी पायाभूत सुविधांचे बांधकाम सध्या सुरू आहे. याचा अर्थ असा की, आज भारताला लागून असलेल्या चीनच्या सीमेवरील चीनच्या लष्करी कारवाया या दीर्घ काळ चालणाºया हेतूंची फक्त सुरुवात आहे, असेही अहवालाने म्हटले. या सगळ्याचे परिणाम भारतासाठी उघड आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्व लडाखमध्ये चीनशी हिंसक संघर्ष उडाला होता. एकदा चीनच्या पायाभूत सुविधांचे काम पूर्ण झाले की चीनच्या कारवायांच्या तीव्रतेला आधीपेक्षाही जास्त पाठिंबा मिळणार आहे.चीनचा रोख भारताकडेचीनने लष्करी पायाभूत सुविधांची जी उभारणी केली आहे तिचा तपशील व उपग्रहांद्वारे त्या व्यवस्थांच्या घेतलेल्या प्रतिमा पाहता भारताच्या सुरक्षेकडे त्याचा थेट रोख आहे.