ओंकार करंबेळकर
मुंबई, दि. 19 - इराणवरील बंधने उठविल्यानंतर इराणच्या व्यापारधोरणात महत्वाचे बदल घडून येत असल्याचे दिसत आहे. चीनने थेट तेहरानपर्यंत चालविलेल्या नव्या रेल्वेमुळे इराण व चीन यांचेही संबंध अधिक दृढ होत आहेत. कोणे एकेकाळी मध्य आशिया, चीन थेट युरोपपर्यंत रेशीम मार्गाने जोडले गेले होते. अनेक जीवनावश्यक आणि मसाले, मौल्यवान वस्तूंचा व्यापार या मार्गाने होत असे. आता याच रेशीम मार्गावरील व्यापाराचे चीनने रेल्वे मार्गाने पुनरुज्जीवन केले आहे.
चीनच्या झेजियांग प्रांतामधून तेहरानपर्यंत केवळ चौदा दिवसांमध्ये पोहोचलेल्या या मालगाडीला ३२ कार्गो डबे होते. चीनच्या या प्रयत्नाची दखल घेतली जात आहे कारण समुद्रमार्गापेक्षा निम्म्याहून कमी काळात माल पोहोचवण्यात ही रेल्वे यशस्वी झाली आहे. चीनच्या शांघाय बंदरापासून इराणच्या बंदर अब्बास या बंदरापर्यंत वाहतूक करण्यास साधारणत: एका महिन्याचा कालावधी जातो, त्या तुलनेमध्ये ही रेल्वे अधिक वेगवान असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या प्रवासात या रेल्वेने कझाखस्तान, किरगिझीस्तान, उझबेकीस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांच्या सीमांमधूनही प्रवास केला. इतकेच नव्हे तर दोन देशांमध्ये स्टँडर्ड गेज नसल्यामुळे गेज बदलही करावा लागला.
भारताने इराणशी व्यापार संबंध वाढविण्यासाठी इराणच्या चाबहार बंदराचा विकास हाती घेतला असता चीनने केलेल्या या वेगवान प्रयत्नांकडे भारताला विशेष लक्ष दिले पाहिजे. रेशीम मार्गाचे रेल्वेमार्गाने पुनरुज्जीवन करण्यापुर्वी चीनने समुद्रमार्गानेही भारताच्या भोवतीच व्यापार मार्गाचे जाळे विणलेले आहे. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदिव, सोमालिया अशा देशांना आणि महत्वाच्या स्थानावर असणा-या बेटांना जोडून स्टींग ऑफ पर्ल्स हा सागरी व्यापार प्रकल्प चीनने आधीच तडीस नेला आहे. इराणच्याच बाबतीत बोलायचे झाले तर चीन आणि इराण यांनी तेलाच्या वापारावर स्थापन केलेले आपले संबंध इतर वस्तूंच्या बाबतीतही घट्ट केले आहेत. २०१४ साली तेलाचे दर उतरण्यापुर्वीच्या काळामध्ये दोन्ही देशांमध्ये ५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार होता. जानेवारी महिन्यात चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी तेहरानला भेट देऊन विविध विषयांवरील द्विपक्षीय चर्चेत सहभाग घेतला आणि हा व्यापार ६०० दशलक्ष डॉलर्सवर नेण्याचा मानस दोन्ही देशांनी व्यक्त केला.
चीन आणि इराणच्या या नव्या संबंधांवर भारताने भीतीयुक्त नजरेतून पाहण्यापेक्षा आपणही व्यापारवृद्धीसाठी कोणती पावले उचलू शकतो याचा विचार केला पाहिजे.