शिनजियांग - गेल्या काही वर्षांमध्ये चीनने विज्ञान आणि आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याच प्रगतीच्या जोरावर चीनने असे काही आविष्कार केले आहेत ज्यामुळे भारतासह चीनच्या शेजारील देशांची चिंता वाढणार आहे. आता चीनने पक्ष्यांच्या आकाराचे ड्रोण विकसित केले आहेत. चीनने हे ड्रोण सीमेवर तैनात करण्याच सुरुवात केली असून, चीनच्या या अत्याधुनिक गुप्तहेरांमुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने शिनजियांग प्रांतात या तंत्राचा वापर करून तयार करण्यात आलेल्या ड्रोणचा सर्वाधिक वापर करण्यात येत आहे. चीनच्या या प्रांताची सीमा भारताला लागलेली आहे. तसेच भारत आणि चीनमधील वादग्रस्त अक्साई चीन हा भागसुद्धा याच परिसरात आहे. दरम्यान, पक्षाच्या आकाराच्या या ड्रोणचे DOVE असे नामकरण करण्यात आले आहे. भारताबरोबरच मंगोलिया. रशिया, कझाखस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान या देशांची सीमाही शिनजियांग प्रांताला लागून आहे. मुस्लिमबहुल असलेल्या या भागाला चीन दहशतवादाचे केंद्र मानतो. त्यामुळेच चिनी सरकार या प्रांतावर करडी नजर ठेवून असतो. हे ड्रोण खऱ्या पक्षाप्रमाणे उडू शकते. पक्षांच्या आकाराचे हे ड्रोण रडारच्या पकडीमध्ये येऊ शकत नाही, तसेच हे ड्रोण पक्षांच्या हालचालींची 90 टक्के नक्कल करू शकते, असे या प्रकल्पाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले. सीमेवर तैनात करण्यापूर्वी या ड्रोणचे सुमारे 2 हजार वेळा परीक्षण करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पावर सुमारे 105 कोटी अब्ज रुपये खर्च झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
चीनच्या गुप्तहेर चिमण्यांनी वाढवली भारताची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 3:05 PM