बिजींग - पाकिस्तानातील तीन महत्वांच्या रस्ते प्रकल्पांचा निधी रोखण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरतंर्गत (CPEC) या तीनही रस्ते प्रकल्पांसाठी चीनकडून फंडिग करण्यात येत होते. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चीनने तात्पुरता निधी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या कृतीने पाकिस्तानला जबर धक्का बसल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.
चीनकडून नवीन मार्गदर्शकतत्व जारी झाल्यानंतर पुन्हा फंडिग सुरु होईल असे वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी सांगितले. चीनने वन बेल्ट वन रोड ही महत्वाकांक्षी योजना आखली असून 60 अब्ज डॉलर्सचा सीपीईसी प्रकल्प या योजनेतील महत्वाचा टप्पा आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून जाणारा हा प्रकल्प बलुचिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडणार आहे. चीनच्या निर्णयाचा डेरा इस्माइल खान ते हॉब रोड, हुझदार ते बासीमा रोड आणि रायकोट ते थाकोट या तीन प्रकल्पाच्या कामावर परिणाम होणार आहे.
सीपीईसी प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे आले आहेत. ऑक्टोंबर महिन्यात पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील कामगारांच्या वसतिगृहावर अज्ञात आरोपींनी ग्रेनेड हल्ला केला होता. या ग्रेनेडच्या स्फोटात 26 कामगार जखमी झाले होते. हे बंदर सीपीईसी प्रकल्पाचा भाग आहे.
ग्वादर बंदर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. या भागात विपुल साधन संपत्ती आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पाला बलुचिस्तानमध्ये मोठा विरोध आहे. हे बंदर पश्चिम चीनला मध्यपूर्व आणि युरोपशी जोडणार आहे. या प्रकल्पासाठी काम करणा-या चिनी नागरीकांवर यापूर्वीही इथे हल्ले झाले आहेत. वसतिगृहात कामगार जेवायला बसलेले असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने ग्रेनेड फेकले अशी माहिती पोलीस अधिकारी इमाम बक्षी यांनी दिली.
पाकिस्तान नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर करत असल्याने बलुचिस्तानातल्या अनेक गटांचा सीपीईसी प्रकल्पाला विरोध आहे. बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी सुद्धा सक्रीय आहेत. दहशतवादी हल्ले करुन इथे सुरु असलेल्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 2014 पासून आतापर्यंत बलुचिस्तानात 50 पाकिस्तानी कामगारांची हत्या झाली आहे.