ऑनलाइन लोकमत
पेइचिंग, दि. 13 - धार्मिक कट्टरतेविरोधात चीनने कठोर भूमिका घेण्याची तयारी सुरू केली आहे. चीनच्या सरकारने कट्टरतेविरोधात आक्रमक पावले उचलत कट्टरवाद मोडून काढण्यासाठी नवी रणनीती आखली आहे. चीनमध्ये अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमांपैकी अनेक जण सीरिया आणि इराकमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून लढत आहेत.
शाहरत अहान चीनच्या मुस्लिम बहुल शिनजांग प्रांताचे एक ज्येष्ठ नेते आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कायदेविषयक बाबींशी संबधित अधिकारी आहेत. रविवारी त्यांनी इशारा देताना सांगितले की आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या दहशतवाद विरोधी स्थितीमुळे चीनमध्ये अस्थिरता निर्माण होत आहे. गेल्या वर्षी राष्ट्रपती शी जिनिपिंग यांनी चीनमधील धार्मिक आणि सांप्रदायिक अल्पसंख्याकावर गांभीर्याने लक्ष देण्याचे सुतोवाच अनेकवेळा केले होते. तर चीनमधील संवेदनशील असलेल्या शिजियांग प्रांतातील स्थानिक नेत्यांनी संपूर्ण प्रांतातील सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक केली आहे.
शिजियांग प्रांतात उइगर मुस्लिम बहुसंख्येने आहेत. या प्रांतात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. गेल्या काही काळात तेथे पोलिस आणि लष्कराकडून वारंवार शक्तिप्रदर्शन झाले आहे. शिजियांग प्रांतात गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने हिंसाचार होत असून, चीनी सरकारकडून या हिंसाचारासाठी उइगर मुस्लिमांना दोषी ठरवण्यात येत आहे.