बीजिंग - अपयशी प्रक्षेपणानंतर चीनचं एक रॉकेट भरकटलं असून, शास्त्रज्ञांकडून त्याबाबत धोक्याच्या इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर स्पेनमधील अनेक विमानतळ बंद करण्यात आले आहेत. तसेच अनियंत्रित झालेले हे २३ टन वजनाचे रॉकेट वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. तसेच या रॉकेटचे अवशेष कधीही पृथ्वीवर पडू शकतात, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक देशांना मोठा धोका निर्माण झालेला आहे.
मात्र या रॉकेटचे अवशेष नेमके कुठे पडतील, याबाबतचा निश्चित अंदाज कुणालाही आलेला नाही. या रॉकेटचे अवशेष युरोपच्या काही भागांवरून उडतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे युरोपमधील अनेक देशात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून स्पेनने अनेक विमानतळांवरून विमानांचं उड्डाण पूर्णपणे थांबवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चिनी रॉकेट मेंग्शनचं प्रक्षेपण सोमवारी दुपारी हैनान येथील वेनचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून करण्यात आलं होतं. चिनी तज्ज्ञांनी या रॉकेटला अंतराळ स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी १३ तास लागतील, अशा दावा केला होता. मेंग्शनचं वजन सुमारे २३ टन असून, उंची ५८ फूट एवढी आहे. तर जाडी सुमारे १३.८ फूट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार शास्त्रज्ञांनी सांगितले की, हे रॉकेट पाच नोव्हेंबर रोजी पृथ्वीच्या वातावरणात येताच नष्ट होईल. मात्र त्याचे अवशेष तुटून पृथ्वीवर कुठेही पडू शकतात. चीनचे एखादे रॉकेट अनियंत्रित होऊन दुर्घटना घडण्याचा प्रसंग येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी जुलै महिन्यात चीनचं रॉकेट लॉन्च झाल्यानंतर काही काळातच परत पृथ्वीवर येऊन पडलं होतं. तेव्हा त्या चिनी रॉकेटचे अवशेष मलेशिया आणि आजूबाजूच्या देशात येऊन पडले होते.