चीनचे गेल्या काही महिन्यांत अंतराळात पाठविलेले दुसरे रॉकेट अनियंत्रित झाले आहे. यामुळे ते जगभरात कुठेही कोसळण्याची शक्यता नासाचे शास्त्रज्ञ जोनाथन मैक्डॉवेल यांनी वर्तविली आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
चीनचे हे रॉकेट कुठे कोसळेल याची ठोस माहिती मिळालेली नाही. २४ जुलैला चीनचे एक लाँग मार्च रॉकेट अंतराळात झेपावले होते. या रॉकेटद्वारे चीनच्या स्पेस स्टेशनचा काही भाग अंतराळात पोहोचविण्यात आला होता. मात्र, यानंतर काही वेळातच या रॉकेटवरील नियंत्रण सुटले आणि ते भरकटले आहे. हे रॉकेट या आठवड्यात कुठेही कोसळू शकते.
चीनचे रॉ़केट यापूर्वीही अनियंत्रित होण्याचे प्रकार घडले आहेत. तीन वर्षांत ही तिसरी वेळ आहे. चीनचे रॉकेट त्याली कामगिरी पूर्ण करते आणि नंतर परत पृथ्वीवर परतत असताना अनियंत्रित होते. यामुळे जगभरातील देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चीन या देशांना नेहमी ते रॉकेट नष्ट करण्याची आश्वासने देतो. काही महिन्यांपूर्वी देखील चीनचे असेच एक अनियंत्रित झालेले रॉकेट पृथ्वीवर कोसळले होते. त्यापूर्वी २०२० मध्ये चीनचे रॉकेट आफ्रिका आणि अटलांटिक महासागरामध्ये कोसळले होते.
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी आगीचे गोळे कोसळताना दिसले होते. ते देखील चीनच्या रॉकेटचे भाग होते, असा अंदाज तज्ज्ञांनी लावला होता.