हरारे : आफ्रिकेतील विविध देशांतील पायाभूत सुविधांंमध्ये पैसा ओतणाऱ्या चीनचे युआन हे चलन झिम्बाब्वे स्वीकारण्याच्या तयारीमध्ये आहे. चीन आणि आफ्रिका यांच्यातील संभाव्य करारानुसार हे चलन स्वीकारले जाईल आणि त्या बदल्यामध्ये चीन ४० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज माफ करेल. युआन स्वीकारण्याची यापेक्षा कोणतीही दुसरी चांगली वेळ नसेल, अशा शब्दांमध्ये झिम्बाब्वेचे अर्थमंत्री पॅट्रिक चिनासामा यांनी केल्यामुळे लवकरच हा करार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. नव्या करारानुसार या चलनयादीत युआनचा समावेश होऊन चीनचे प्रभुत्व वाढीस लागणार आहे. अमेरिकेच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी युआनचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला झिम्बाब्वेमधील अर्थतज्ज्ञ यापूर्वीच देत होते. युआनचा वापर वाढीस लागावा यासाठी सेंट्रल बँक आॅफ झिम्बाब्वेचे अध्यक्ष जॉन मांगुद्या चीनच्या पीपल्स बँक आॅफ चायनाशी पूर्वीपासूनच संपर्कात होते. चीनने आफ्रिकेमध्ये रस्ते, रेल्वे तसेच ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहेच. पाश्चिमात्य देशांना समांतर अशी वेगळी बाजारपेठ आफ्रिकेच्या निमित्ताने शोधून चीनने आपला व्यवसाय वाढविला आहे.घसरलेले चलनसहा महिन्यांपूर्वी झिम्बाब्वेचे चलन झिम्बाब्वियन डॉलरचे मूल्य अत्यंत खाली गेल्यामुळे ते प्रभावहीन ठरविण्यात आले होते. देशात झालेल्या जबरदस्त चलनवाढीमुळे हा निर्णय घ्यावा लागला होता. अर्थात, २००८ पासूनच नागरिकांना अमेरिकन डॉलर आणि दक्षिण आफ्रिकेचे रँड चलन वापरण्याची मुभा देण्यात आली होती. २००९ साली अफाट चलनवाढ झाल्यामुळे स्वदेशी चलनाचे महत्त्व तेव्हापासूनच कमी झाले होते. याचवर्षी एक लाख मूल्याची झिम्बाब्वे डॉलरची नोट चलनात आणावी लागली होती. (वृत्तसंस्था)> झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या विरोधात मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे आरोप करीत पाश्चिमात्य देशांनी खड्यासारखे बाजूला केले होते. याचाच फायदा चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांनी घेतला. चीन हा आता झिम्बाब्वेचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय भागीदार झाला आहे. जिनपिंग यांनी बांधकाम तसेच ऊर्जा क्षेत्रातील विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आणि हरारे भेटीत अनेक करारांवर दोन्ही नेत्यांनी स्वाक्षऱ्याही केल्या.
चीनची आफ्रिका खंडात पाय पसरण्याची खेळी
By admin | Published: December 24, 2015 12:13 AM