मागच्या काही वर्षांमध्ये चीनने अंतराळ संशोधनात बरीच मोठी मजल मारली आहे. दरम्यान, चिनी अंतराळवीरांनी आता अंतराळात पृथ्वीच्या कक्षेमध्ये रोपं रुजवून आणखी मोठी कमाल केली आहे. चीनच्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेने याबाबतचा एक व्हिडीओसुद्धा प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये तियांगोंग अंतराळ स्थानकामध्ये उपस्थित असलेले चिनी अंतराळवीर विविध प्रयोग करताना दिसत आहेत. चीनने २५ एप्रिल रोजी तीन सदस्यीय शेंझोवू १८ यान अंतराळात पाठवलं होतं. तेव्हापासून कमांडर ये गुआंगफू, ली कांग आणि ली गुआंगसू हे अंतराळवीर तिथे आहेत.
दरम्यान, चीनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या व्हिडीओमध्ये हे अंतराळवीर निरीक्षणापासून देखभाल दुरुस्तीपर्यंतची काम पार पाडताना दिसत आहेत. या अंतराळवीरांनी अंतराळ स्टेशनवर एके ठिकाणी काही झाडंही रुजवली आहेत. ती एका ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, अंतराळात असलेले हे चिनी अंतराळवीर नोव्हेंबर महिन्यापर्यंत तिथे राहणार आहेत. पृथ्वीवर परतण्यापूर्वी ते अंतराळ स्थानकाचं नियंत्रण शेंन्झोवू १९ च्या अंतराळवीरांकडे सोपवतील.
चीनचं तियांगोंग हे अंतराळ स्थानक हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षा मोठं आहे. या अंतराळ स्थानकामध्ये किमान १० वर्षे तरी नियमितपणे अंतराळवीरांना कायम वास्तव्यास ठेवण्याचा चीनचा इरादा आहे. चीनने या अंतराळ स्थानकाच्या बांधणीला २०२१ मध्ये सुरुवात केली होती. तर वर्षभरानंतर २०२२ मध्ये त्याची बांधणी पूर्ण झाली होती. येथे दर सहा महिन्यांनी नव्या अंतराळवीरांना पाठवलं जातं. तियांगोंग अंतराळ स्थानक पृथ्वीपासून ३४० ते ४५० किमी उंचीवरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असते.