लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीनचे प्रसिद्ध अब्जाधीश आणि अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांचे नोव्हेंबरपासून सार्वजनिक दर्शन झालेले नाही. त्यामुळे ते बेपत्ता असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.जॅक मा यांनी चीन सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केल्यामुळे त्यांच्यावर सरकारची खप्पा मर्जी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. ब्रिटिश वृत्तपत्र ‘युके टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, जॅक मा हे नोव्हेंबरमध्ये त्यांच्याच कंपनीने आयोजित केलेल्या ‘आफ्रिकाज बिझनेस हीरोज’ या टॅलेंट शोच्या अंतिम भागात परीक्षक म्हणून उपस्थित राहणार होते. तथापि, ते कार्यक्रमाला आलेच नाहीत. त्यांच्या जागी कंपनीचा एक कार्यकारी अधिकारी उपस्थित राहिला. १.५ दशलक्ष डॉलरचे बक्षीस या शोमध्ये होते. शोच्या वेबसाइटवरून मा यांचा फोटोही काढून टाकण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रचार व्हिडीओच्या शूटमध्येही ते सहभागी झाले नव्हते.जॅक मा यांनी ऑक्टोबरमध्ये चीनच्या वित्तीय नियामकावर टीका केली होती. नियामकाच्या नियमांना त्यांनी ‘म्हाताऱ्यांचा क्लब’ असे म्हटले होते. चिनी बँकांना त्यांनी ‘सावकारी दुकाने’ म्हटले होते. या टीकेमुळे चिडलेल्या सरकारने जॅक मा यांच्या अँट समूहाचा एक आयपीओ रोखला. अलिबाबाविरुद्ध डिसेंबर २०२० मध्ये एकाधिकारशाहीविरोधी चौकशी सुरू करण्यात आली. अलिबाबाच्या प्रवक्त्याने म्हटले की, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे जॅक मा टॅलेंट शोला उपस्थित राहू शकले नाहीत.
चिनी अब्जाधीश जॅक मा बेपत्ता असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 5:43 AM