मुंबई - देशात 15 दिवसांपासून लडाखच्या सीमेवर भारत-चीनमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनच्या 43 सैनिकांना ठार करण्यात आलं आहे. तेव्हापासून देशभरातून चीनवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. तर, भारतीयांनी चिनी अॅप्स, मोबाईल आणि इतर सर्व गोष्टी वापरणं बंद करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतंय. त्यातच, मोदी सरकारने चीनच्या 59 अॅप वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या बंदीनंतर चीनच्या सत्ताधारी पक्षाच्या वृत्तपत्राने भारतावर टीका केलीय. या टीकेला उद्योगपती आनंद महिंद्रांनी जशात तसं उत्तर दिलंय.
चीनमधील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. भारताने बॅन केलेल्या 59 अप्सपैकी ट्विटरसारखे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेलं Vigo अॅपही आहे. ज्या अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हेरीफाईड अकाऊंट असून त्यावर 2 लाख 40 हजार फॉलोवर्स आहेत, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. तसेच, चीनच्या ग्लोबर टाइम्सचे संपादक हू शिजिन ट्विट करुन भारतीयांना चॅलेंजच केलंय. चीनच्या लोकांनी भारतीय उत्पादनास बॅन करायचा निर्णय घेतला, तर त्यांना पर्यायही नाही. कारण, भारतीयांकडे तसे काही नाही की, जे चीनी नागरिकांनी बॅन करावे, असे म्हणत संपादक महाशयांनी निशाणा साधला होता. त्यास, उद्योगपती आनंद महिंद्र यांनी सडेतोड उत्तर दिलंय,
'आपण भारतीयांना उद्देशून केलेली टीका ही पहिल्यांदाच आहे, त्यामुळे सर्वात प्रेरक आणि प्रभावी सिद्ध होईल. आम्हाला डिवचल्याबद्दल धन्यवाद, आम्ही या संधीचं सोनं करुन दाखवू', असे प्रत्युत्तर महिंद्रा यांनी दिलंय.
दरम्यान, भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला. त्यामध्ये भारतातील लोकप्रिय सोशल मीडिया अॅप असलेल्या टीकटॉकचाही समावेश आहे. टीकटॉक बंद झाल्याने टीकटॉक स्टार आणि टीकटॉकद्वारे मनोरंजन करणारे युजर्सं निराश झाले आहेत. त्यातच, आता प्ले स्टोअरवरुन हे अॅप काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे, आता नव्याने टीकटॉक इन्स्टॉल होऊ शकणार नाही.