महिलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील ‘मी टू’ मोहीम आता जवळपास अख्ख्या जगात माहीत झाली आहे. कारण, जगातील असा एकही देश नाही, जिथे महिलांना लैंगिक अत्याचारांना सामोरं जावं लागलं नाही. त्यामुळेच अमेरिका, ब्रिटनसारख्या प्रगत देशांमध्येही महिलांना आपल्यावर झालेल्या अत्याचारांविरुद्ध दाद मागण्यासाठी, ‘स्त्री’ म्हणून आपल्याला कोणत्या छळाला सामोरं जावं लागलं, याची माहिती तरी किमान जगाला कळावी आणि झालंच तर त्या बड्या धेंडांना चाप बसावा, इतर महिला त्यांच्या जाचातून सुटाव्यात आणि अत्याचार करणाऱ्यांना स्वत:लाही आपल्या कृत्याची जबाबदारी, त्याचं प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडता यावं, यासाठी ही मोहीम महिलांनी चालवली.
कमी-अधिक प्रमाणात जगात सर्वत्र महिलांनी आपल्याला ज्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं त्याला तोंड फोडण्यासाठी ही पद्धत वापरली. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, अशा प्रकारच्या अत्याचारांना आळा बसला. या मोहिमेचा गैरफायदा घेऊन काही निरपराधी लोकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले असतीलही; पण त्याचं प्रमाण फारच थोडं. ज्या देशाचे पोलादी साखळदंड कधीही तोडले गेले नाहीत आणि खरी माहिती कधीच जगासमोर येऊ शकली नाहीत, अशा चीनमध्येही ‘मी टू’ मोहीम चालवली गेली, एक-दुसरीच्या आधारानं अनेक महिलांना बळ मिळालं आणि त्यांनीही आपल्यावर झालेल्या अन्यायाची फिर्याद मांडली. अर्थात चीनमध्ये प्रत्येक वेळी जे होतं, तेच याही वेळी झालं. त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराची कुठलीही दखल घेतली गेली नाही. उलट त्यांनाच तोंड बंद करायला सांगण्यात आलं. एवढंच नाही, दोषींवर कारवाई करण्याऐवजी ज्या महिला या अत्याचाराला बळी पडल्या, त्यांच्यावरचा कारवाईचा बडगा उगारण्यात आला!
आता आणखी एक प्रकरण चीनमध्ये चांगलंच गाजतं आहे. तेथील शाळेत नवा सिलॅबस शिकवला जात आहे. या सिलॅबसमध्ये मानसिक आरोग्याबाबत एका प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. हा सिलॅबस खरं तर गेल्या वर्षीच लागू करण्यात आला; पण त्याचं स्टडी मटेरियल सध्या सोशल मीडियावर तुफान वेगानं व्हायरल होतं आहे. प्रकरण जरी मानसिक आरोग्याबाबत असलं तरी त्यात ‘सेक्स एज्युकेशन’चे धडे देण्यात आले आहेत! अर्थात हे धडेही कसे? - तर महिलांनी, मुलींनी चारचौघांत कसं वावरावं, कोणते कपडे घालावेत, कोणते घालू नयेत, त्यांचं ‘सार्वजनिक आचरण’ कसं असावं याबाबत..यावरूनच केवळ चीनमध्येच नाही, तर संपूर्ण जगात रान उठलं आहे. अमेरिकेतील माध्यमं आणि चॅनेल्सनंही याची जोरदार दखल घेतली आहे. त्यावरून जगात चीनची छी..थू.. सुरू आहे.
लैंगिक छळापासून वाचायचं असेल तर मुली, महिलांनी काय केलं पाहिजे, याबाबतच्या टिप्स यात देण्यात आल्या आहेत. या टिप्स सांगतात, मुळात आपल्याला अशा कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल, अशी परिस्थिती महिलांनीच निर्माण करू नये. त्यांनी आपला पेहराव अतिशय साधासुधा ठेवावा. पूर्ण अंगभर कपडे घालावेत. आपल्या शरीराचे सर्व अवयव झाकलेल्या अवस्थेत ठेवावेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिला, मुलींची कृतीही अशी असली पाहिजे की, लोकांना त्यामुळे वाटू नये की ही आपल्याशी फ्लर्ट करते आहे किंवा इतर पुरुषांमध्येही तिच्याशी फ्लर्ट करण्याची भावना जागृत होऊ नये. लैंगिक शोषणापासून वाचण्याचा हा पहिला आणि सर्वोत्तम मार्ग आहे. महिला आणि मुलींनी भडक, चित्तवेधक कपडे परिधान केले आणि त्यांना काही अनपेक्षित प्रसंगांना सामोरं जावं लागलं तर त्याला त्या स्वत:च जबाबदार असतील, असा याचा थोडक्यात अर्थ.
चीनमध्ये ‘विबो’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. त्यावर सरकारचे पूर्णपणे नियंत्रण आहे. इथे जर तुम्ही काही भल्याबुऱ्या पोस्ट टाकल्या, तर सरकार लगेच तुम्हाला ‘उचलतं’, तुमच्यावर कारवाई करतं. तरीही लोकांनी या प्रकाराबद्दल तिथे उघड नाराजी व्यक्त केली आहे. एका चिनी यूजरनं म्हटलं आहे, या मजकुरावरून सिद्ध होतं, आमच्या देशात महिला आणि पुरुषांमध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव होतो. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, चीनमध्ये प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी कायम महिलांनाच जबाबदार ठरवलं जातं. आणखी एका यूजरनं म्हटलं, पुन्हा एकदा महिलांनाच ‘गुन्हेगार’ ठरवलं जातं आहे. सेक्शुअल हॅरॅसमेंट ही गोष्ट आमच्याकडे कधीच नवीन नव्हती, नाही. महिला, मुली कोणते कपडे घालतात याच्याशी त्याचा दुरान्वयानेही संबंध नाही.
बाई, तू उत्तान पोशाख का केलास?.. काही दिवसांपूर्वीच एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं होतं. त्याचे व्हिडीओही सर्वत्र व्हायरल झाले होते. याबद्दल त्या महिलेनं तक्रारही नोंदवली होती; पण यावेळीही अनेकांनी तिलाच दोषी ठरवलं आणि सांगितलं, बाई, तू जर उत्तान पोशाख केला नसता, तर तुझ्यावर अशी वेळ आलीच नसती.