चीनच्या निष्काळजीपणामुळे जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला. आता तोच चीन मंकीपॉक्स व्हायरसबद्दल अजब-गजब सल्ले, माहिती देत आहे. चीनच्या एका आरोग्य अधिकाऱ्याने देशातील नागरिकांना मंकीपॉक्सपासून दूर राहण्यासाठी भलताच सल्ला दिला आहे. परदेशी आणि नुकतेच परदेशातून परतलेल्या लोकांना स्पर्श करू नका असं म्हटलं आहे. आरोग्य अधिकाऱ्याने दिलेला इशारा हा भेदभाव करणारा असल्याचे सांगून सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे.
मंकीपॉक्समुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या चोंगकिंग शहरात मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळून आला. चीनमध्ये या व्हायरसचे पहिले प्रकरण आहे. मंकीपॉक्सची पुष्टी झालेली व्यक्ती नुकतीच परदेशातून परतली होती. पण ती व्यक्ती कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांमुळे क्वारंटाईन झाली होती. चीनचे महामारीशास्त्रज्ञ वू जुनयू यांनी नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी परदेशी लोकांना स्पर्श न करण्याचा अजब सल्लाही दिला.
आंतरराष्ट्रीय प्रवास आणि एकमेकांच्या संपर्कातून मंकीपॉक्स पसरण्याची जोखीम असल्याचं म्हटलं आहे. पण त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्यावरच टीका केली जात आहे. एका यूजरने वीबो (चीनचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म) वर लिहिले, माझ्यासारख्या लोकांचे काय जे चीनमध्ये जवळपास 10 वर्षांपासून राहत आहोत. तर दुसर्या यूजरने खूप अन्यायकारक असून अजूनही चीनमध्ये बरेच परदेशी मित्र काम करत आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.