काबुल-
अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये सोमवारी दुपारी एक जबरदस्त बॉम्बस्फोट झाला. शहरातील स्टार-ए-नौ हॉटेलला हल्लेखोरांनी लक्ष्य केलं आहे. या हॉटेलला चायनीज हॉटेलही म्हटलं जातं. कारण या हॉटेलात बहुतांश चीनी अधिकारी येत असतात. हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. पण परिसरात बॉम्बस्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.
एएफपी या वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी चीनचे व्यापाऱ्यांचं येणं-जाणं असतं. स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी या हल्ल्याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियात शेअर केले आहेत. काबुलमध्ये शारेनो परिसरात एक चीनी हॉटेलवर हल्ला झाला असून हॉटेलमधून गोळीबाराचा आवाज ऐकू येत असल्याचं माध्यम प्रतिनिधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काबुलमध्ये याआधीही हल्ल्याची बातमी समोर आली होती. महिन्याच्या सुरुवातीला काबुल स्थित पाकिस्तानी दूतावासावर हल्ला झाला होता. यात राजदूत उबेदुर रहमान निजमानी यांच्यावहल गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. पण घटनास्थळी उपस्थित सुरक्षा रक्षकानं गोळी स्वत:वर झेलत राजदूत निजमानी यांना वाचवलं होतं. संबंधित सुरक्षारक्षक अजूनही गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीप यांनी या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध व्यक्त केला होता. तालिबान सरकारकडून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती.