शांघाय : अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण चिनी समुद्रातील वाढता तणाव, तसेच अमेरिकेसोबत व्यापार आणि तैवानच्या मुद्यावरून निर्माण झालेला संघर्ष यामुळे चीन आपले लष्कर सुसज्ज करू इच्छित आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपल्या लष्कराला युद्धसज्ज राहण्याचे आदेश दिले. शी जिनपिंग हे चिनी लष्करी आयोगाचे चेअरमनही आहेत.
जिनपिंग यांनी सांगितले की, चिनी लष्कराने नव्या युगातील जबाबदाºया पेलण्यासाठी, तसेच युद्धसज्ज होण्यासाठी आणि युद्ध करण्यासाठी अत्यावश्यक धोरणे आखायला हवीत. गेल्या शंभर वर्षांत पाहिले नाहीत, असे बदल सध्या जगात होत आहेत. चीन अजूनही विकासासाठी धोरणात्मक संधीच्या काळात आहे. आपत्तीच्या काळात तात्काळ प्रतिसाद देता येईल, यासाठी लष्करी दलांनी सक्षम असणे आवश्यक आहे. त्यांनी आपली संयुक्त मोहिमांची क्षमता वाढवायला हवी. नव्या लढाऊ तुकड्या उभारायला हव्यात. (वृत्तसंस्था)तैवानवरून वाद कायमशी जिनपिंग यांनी बुधवारीच तैवानच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. तैवानसोबत एकत्रीकरणासाठी, तसेच या बेटाचे स्वतंत्र अस्तित्व रोखण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचा हक्क चीनने राखून ठेवला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ‘एशिया रिअॅश्युरन्स इनिशिएटिव्ह अॅक्ट’वर स्वाक्षरी करून तैवानच्या सुरक्षेबाबत अमेरिका वचनबद्ध असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर काही दिवसांतच जिनपिंग यांनी तैवानबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.