ऑनलाइन लोकमत
पेईचिंग, दि. 25 - धार्मिक कट्टरपंथीयांकडून वाढत्या धोकादायक घटनांना आळा घालण्याच्या पार्श्वभूमीवर चीनने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या पेईचिंगमधील मुस्लिम बहुल शिनजांग परिसरात मुलांची नावे सद्दाम आणि जिहाद ठेवण्यास मज्जाव केला आहे.
ह्युमम राइट वॉचने दिलेल्या माहितीनुसार, शिनचांगच्या अधिका-यांनी गेल्या काही दिवसांत डझनहून अधिक नावांवर बंदी घातली आहे, की ती जास्त करुन मुस्लिम समाजामध्ये सर्रास वापरली जातात. अधिका-यांना असे वाटते की, यामुळे धार्मिक कट्टरता वाढण्यास मदत होईल.
रेडियो फ्री एशियाने एका अधिका-याच्या हवाल्याने सांगितले, की चीनने इस्लाम, कुराण, मक्का, जिहाद, इमाम, सद्दाम, हज आणि मदिना अशाप्रकारची नावे ठेवण्यास बंदी घातली आहे. या बंदी घातलेल्या नावांच्या यादीतील एखादे नाव मुलाला ठेवले असेल, तर त्याला सरकारकडून मिळणा-या सुविधांपासून लांब ठेवले जाते. या परिसरातील वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी हे पाऊल चीनकडून उचलण्यात आले आहे. शिनजांग हा परिसर अल्पसंख्यांक उइगर मुस्लिम समुदायाचा आहे.
दरम्यान, ह्युमम राइट वॉचने अद्याप बंदी घातलेल्या नावांची पूर्ण यादी प्रकाशित केली नसून यामागचे मुख्य कारण काय आहे, ते सुद्धा स्पष्ट केले नाही.