ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 13 - चीनचे नोबेल शांती पुरस्कार विजेते लू शाबाओ यांचे आज निधन झाले. लू शाबाओ हे लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते होते. ते चीनमध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ नेहमीच आवाज उठवत होते. त्यामुळे चीनी सरकारने त्यांना तुरुंगातही डांबले होते. त्यांना 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज त्यांचे वयाच्या 61व्या वर्षी निधन झाले.
लू शाबाओ हे यकृताच्या कर्करोगाशी झुंजत होते. त्यामुळे त्यांना गेल्या महिन्यात तुरुंगातून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चीनमधील विद्यापीठात प्राध्यापक असलेले शाबाओ कालांतराने चीनमधील मानवाधिकार आंदोलनाचे आवाज बनले होते. त्यांच्या या कार्यामुळे संतप्त झालेल्या चीनी अधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हेगार ठरवले होते.
मानवाधिकारासाठी आवाज उठवल्याने शाबाओ यांना अनेकदा तुरुंगात डांबण्यात आले होते. एवढेच नाही तर तुरुंगातून बाहेर असतानाही त्यांच्यावर विविध निर्बंध लादण्यात येत असत. त्यांच्या पत्नीलाही नजरकैदेत ठेवले जाई. शाबाओ यांना उपचारांसाठी परदेशात जाण्याची परवानगी देण्यात यावी असे अनेक पाश्चात्य देशांनी चीनला सांगितले होते. एक जर्मन आणि एका अमेरिकन डॉक्टरांना काही दिवासंपूर्वीच त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी शाबाओ यांची प्रकृती परदेशात उपचार करण्यासारखी असल्याचे सांगितले होते. पण शाबाओ हे उपचारांसाठी परदेशात जाऊ शकत नाहीत एवढे चीनी डॉक्टर अखेरपर्यंत सांगत राहिले.