शेनयांग (चीन) : चीनच्या नागरिकांना मुलभूत मानवी व लोकशाही हक्क मिळावेत यासाठी लढा देणारे नोबेल शांतता पुरस्कारविजेते लियू शियाओबो (६१) यांचे गुरुवारी बंदिवासात निधन झाले. रुग्णशैयेवर असलेल्या लियू यांना निदान उपचारांसाठी तरी देशाबाहेर जाऊ द्यावे, अशी मागणी जगभरातून केली गेली होती. परंतु ती झुगारून चीनने या स्वातंत्र्यवाद्यास कैदी म्हणूनच अखेरचा श्वास घ्यायला लावल्याबद्दल तीव्र दु:ख व निषेध व्यक्त होत आहे.राष्ट्रद्रोहाबद्दल दोषी ठरवून चीन सरकारने सन २००८ मध्ये लियू यांना ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर दोनच वर्षांनी सन २०१० चा नोबेल शांतता पुरस्कार त्यांना जाहीर झाला. तो स्वीकारण्यास चीन सरकारने लियू यांना नॉर्वेमध्ये आॅस्लो येथे जाऊ न दिल्याने त्या समारंभात विजेत्याच्या रिकाम्या खुर्चीला प्रतिकात्मक पुरस्कार बहाल केला गेला होता.महिनाभरापूर्वी यकृताच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर चीन सरकारने लियू यांना वैद्यकीय पॅरॉलवर सोडून सरकारी इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. परंतु तोपर्यंत बराच उशिर झाला होता व त्यांचा आजार बळावत गेला. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे हे कळल्यावर अमेरिका व जर्मनीसह अनेक देशांनी मानवी हक्कांचा हवाला देत त्यांच्यावर उपचार करण्याची तयारी दर्शविली होती. परंतु आमच्या देशांतर्गत बाबीत कोणीही ढवळाढवळ करण्याची गरज नाही, असे फटकारत चीनने त्यांना देशाबाहेर जाऊ दिले नव्हते.मुलभूत मानवी हक्क मिळावेत व चीनची एकपक्षीय राजकीय व्यवस्था अधिक खुली व लोकाभिमुख करावी यासाठी ‘चार्टर ०८’ नावाची स्वाक्षरी मोहीम चालविल्याबद्दल त्यांना राष्ट्रद्रोही ठरविले गेले. १९८९ मध्ये बीजिंगस्थित तियानानमेन चौकातील ऐतिहासिक लोकशाहवादी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाने चिनी सत्ताधाऱ्यांना गेली अनेक वर्षे सलणारा काटा कायमचा दूर झाला आहे. चीनमध्ये प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध उठणारा अवाज कसा निर्दयतेने चिरडून टाकला जातो, याचे प्रतिक म्हणून लियू यांच्या मृत्यूकडे पाहिले जाईल. त्यांच्या पत्नी लियू शिया यांनाही २०१० मध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते.>कैदेतील दुसरा ‘नोबेल’ मृत्यूजगभर गौरव झालेले परंतु स्वदेशातील छळामुळे तुरुंगातच अखेरचा श्वास घ्यावा लागलेले लियो हे दुसरे नोबेल शांतता पुरस्कारविजेते ठरले आहेत. याआधी जर्मनीचे शांततावादी कार्ल व्हॉन ओस्सिएत्सी यांचे जुलमी नाझी राजवटीच्या तुरुंगात सन १९३८ मध्ये निधन झाले होते.>लियू शियाओबो यांच्या अकाली मृत्यूस चीन सरकार पूर्णपणे जबाबदार आहे.- नोबेल पुरस्कार समिती
चिनी नोबेल विजेत्याचे बंदिवासातच निधन
By admin | Published: July 14, 2017 5:07 AM