बिजिंग : चीनमधील गुआंग्शी झुआंग येथील स्थानिक कुटुंब नियोजन केंद्रामध्ये 11 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, येथील तपासात एका जोडप्याची 15 मुले असल्याची माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, गुआंग्शी झुआंग येथे राहणारे लियांग (76 वर्षे) आणि त्यांची पत्नी लू होंगलेन (46 वर्षे) यांनी 1995 ते 2016 या कालावधीत 4 मुले आणि 11 मुलींना जन्म दिला. या प्रकरणी कुटुंब नियोजन केंद्रातील एकूण 11 अधिकारी व कर्मचारी आपल्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोषी आढळून आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये रॉन्ग काउंटीमधील लिकुन सिटीचे प्रमुख आणि स्थानिक कुटुंब नियोजन केंद्राचे संचालक यांचाही समावेश आहे.
वन चाइल्ड पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी हे जोडपे पकडले गेले असते तर त्यांनाही या प्रकरणात शिक्षा भोगावी लागली असती. दरम्यान, वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीन सरकारने 1979 मध्ये वन चाइल्ड पॉलिसी लागू केली होती. 2015 मध्ये ही पॉलिसी टू चाइल्डमध्ये बदलण्यात आली. मात्र, सरकारने 21 जुलै 2021 रोजी टू चाइल्ड पॉलिसीतही बदल केला आणि त्याच्याशी संबंधित दंडाची तरतूदही रद्द केली.
1994 मध्ये ग्वांगडोंगमध्ये लियांग आणि लू होंगलेन यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दोघांनी अनौपचारिक लग्न केले. मात्र, दोघांनी लग्नाची नोंदणी केली नाही. या जोडप्याने 2015 ते 2019 पर्यंत गरिबांसाठी मिळणारे अनुदान सुद्धा घेतले. याआधी 2016 मध्ये लियांग प्रसिद्धीच्या झोतात आला होता. जेव्हा असे म्हटले जाते की त्याने त्याच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान महिलेशी लग्न केले होते. विशेष बाब म्हणजे लियांगची पत्नी लू होंगलेन हिने बहुतेक मुलांना घरी जन्म दिला.
दरम्यान, चीनमध्ये सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने मानवी तस्करीविरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान गुआंग्शी झुआंग येथील रॉन्ग काउंटीमध्ये या जोडप्याची माहिती मिळाली. चीनमध्ये पूर्व जिआंग्सू प्रांतातील फॅंग काउंटीच्या हुआनकौ गावात आठ जणांना बेड्या ठोकल्या गेल्यानंतर मानवी तस्करीविरोधात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.