लडाखच्या गलवान खोऱ्यात LACवर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य देखील तयार झाले आहेत. मात्र दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, असं चीनकडून सांगण्यात येत आहे. परंतु दूसरीकडे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आहे.
चीनमधील माध्यमांनूसार, चिनी सैन्य दलाच्या उच्च-गुणवत्तेच्या विकासाला चालना देण्यासाठी सैन्य दलाच्या व्यवस्थापनातील पद्धती सुधारण्याचे निर्देश शी जिंनपिंग यांनी दिले आहे. लष्करी प्रशिक्षण व व्यवस्थापनाबाबत टेली-कॉन्फरन्सवर झालेल्या चर्चेत त्यांनी हे निर्देश दिले असल्याची माहिती 'शिन्हुआ' या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यामुळे भारत आणि चीन तणावादरम्यान शी जिनपिंग यांनी लष्करी अधिकाऱ्यांना आदेश दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यामांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन देशामध्ये लडाखच्या सीमारेषेवरुन मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरु आहे. या संघर्षादरम्यान शी जिनपिंग यांनी सैन्याधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याने या बैठकीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
चीनने आता कुरापती केल्यास योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान सज्ज आहेत. सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तर भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा आपले सैन्य तैनात करण्याची शक्यता भारतीय लष्कराला आहे. भारत एलएसीवरील फायरिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यासंबंधी विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक संघर्षानंतर दोन देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. पण भारतीय सीमेवर संघर्ष वाढू नये, अशी चीनची भूमिका आहे. सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री रात्री दोन्ही देशांमधील हिंसक चकमकीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४३ सैनिकांचा खात्मा केला. तर चीनला सीमेवर आणखी संघर्ष नको आहे. दोन्ही देशांनी या परिस्थितीतून संवाद आणि चर्चेतून मार्ग काढावा, अशी चीनची भूमिका आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.