बीजिंग - अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात चीनने मोठे यश मिळवले आहे. चीनचे चांग ई -4 हे अंतराळ यान चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागात यशस्वीपणे उतरले आहे. सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी चांग ई 4 या यानाने चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्यात यश मिळवले, असे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितले. चीनच्या या मोहिमेमुळे चंद्राच्या अंधाऱ्या भागाची माहिती प्रकाशात येणार आहे. चंद्राचा एकच भाग नेहमी पृथ्वीवरून दिसतो. तर दुसरा भाग कधीही पृथ्वीसमोर येत नाही. हा भाग पृथ्वीपासून दूर असून, त्याबाबतची फारशी माहिती समोर आलेली नाही. चंद्राच्या या भागाला डार्क साइड म्हणून ओळखले जाते. याआधी चीनचे चांग ई 3 हे यान 2013 साली चंद्रावर उतरले होते. सोव्हिएट युनियनच्या 1976 साली चंद्रावर उतरलेल्या लुना 24 या यानानंतर चंद्रावर गेलेले हे पहिलेच यान होते. चांग ई 4 हे यान आपल्यासोबत एक रोव्हर घेऊन गेले आहे. हे रोव्हर लो फ्रिक्वेंसी रेडिओ एस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्वेशनच्या मदतीने चंद्राच्या या भागातील पृष्टभागाची रचना आणि त्यात असलेल्या खनिजांची माहिती घेणार आहे. चीनने 8 डिसेंबर रोजी शियांग सॅटेलाइल लाँच सेंटर येथून मार्च 3बी रॉकेटच्या मदतीने चांग ई 4 ये यान चंद्राच्या दिशेने सोडले होते.
चंद्राच्या अंधाऱ्या भागावर चीनचे यान टाकणार प्रकाश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 12:03 PM
चीनचे चांग ई -4 हे अंतराळ यान चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागात यशस्वीपणे उतरले आहे
ठळक मुद्देचीनचे चांग ई -4 हे अंतराळ यान चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागात यशस्वीपणे उतरले चीनच्या या मोहिमेमुळे चंद्राच्या अंधाऱ्या भागाची माहिती प्रकाशात येणार चांग ई 4 हे यान आपल्यासोबत एक रोव्हर घेऊन गेले आहे. हे रोव्हर लो फ्रिक्वेंसी रेडिओ एस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्वेशनच्या मदतीने चंद्राच्या या भागातील पृष्टभागाची रचना आणि त्यात असलेल्या खनिजांची माहिती घेणार