बीजिंगः चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) व भारतीय लष्कर यांच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांमध्ये शनिवारी सिक्कीममध्ये व रविवारी दुपारी लडाखमध्ये तणातणी व शारीरिक हाणामारीच्या दोन घटना घडल्या. त्यात दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर आता या प्रकरणावर चीनकडून प्रतिक्रिया आली आहे. सीमावर्ती भागात आमचे सैन्य शांतता व संयम राखण्यासाठी कटिबद्ध आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले आहेत.दोन्ही देशांनी आपापले मतभेद नीट सोडवावेत. चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या सैन्याने आमच्या सीमावर्ती भागात शांतता व संयम कायम राखला आहे. चीन आणि भारत सीमेवरील वादासंदर्भात विद्यमान यंत्रणा वारंवार एकमेकांशी संवाद साधून समन्वय साधत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. चीनकडून घेण्यात येत असलेल्या आक्रमक पवित्र्यासंदर्भात विचारले असता, ते म्हणाले संबंधित संकल्पना निराधार आहे. भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक संबंधांचे हे 70वे वर्षांपासूनचे आहेत आणि दोन्ही देशांनी कोरोनाविरोधात एकत्र लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंनी एकत्रित काम केले पाहिजे आणि मतभेद योग्य प्रकारे सोडवले पाहिजेत. सीमाभागात शांतता व स्थिरता कायम ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या द्विपक्षीय संबंधांना अनुकूल वातावरण निर्माण होऊन कोरोनाविरुद्ध एकत्र लढा देता येईल. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतरही चीन आणि भारतामध्ये संवाद सुरू आहे. तसेच भारतीय लष्करानंही अशा प्रकारच्या घटना सीमेवर होत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारताच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ रविवारी दुपारी चीनचे सैनिक भारतीय सैनिकांच्या अंगावर धावून आल्याने दोघांमध्ये झटापट व धक्काबुक्की झाली होती.स्थानिक पातळीवर चर्चेनंतर आता परिस्थिती निवळली असली तरी अजूनही तेथे दोन्ही बाजूचे सैनिक समोरासमोर आहेत. लष्करी मुख्यालयातील सूत्रांनी याला दुजोरा देताना सांगितले की, प्रत्यक्ष सीमारेषा अनेक ठिकाणी स्पष्टपणे आखलेली नसल्याने दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये अशा घटना क्वचितप्रसंगी घडत असतात. ठरलेल्या प्रक्रियेनुसार स्थानिक पातळीवर चर्चा होऊन समजूत घातल्यानंतर असा तात्कालिक वाद सोडविला जातो. एप्रिलच्या अखेरपासून ‘पीएलए’ने आक्रमक पवित्रा घेतल्याने या ताज्या घटनांना सुरुवात झाली आहे. २७ एप्रिल रोजी चिनी सैन्याचे एक वाहन भारताच्या हद्दीत आले होते. भारतीय सैनिकांनी हटकल्यावर ते परत माघारी गेले होते.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लडाकमधील पॅनगाँग त्से सरोवराच्या उत्तर किना-यावर तसेच चुमार व यांगत्से भागातही अशाच घटना घडल्या होत्या. त्याआधी जून २०१७ मध्ये सिक्कीमजवळच्या डोकलाम पठारावर दोन्ही सैन्यांमध्ये ७३ दिवसांचा वाद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहान येथे पहिली अनौपचारिक शिखर बैठक झाल्यानंतर त्या वादावर पडदा पडला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा
कोरोनामुळे अमेरिकेत वाढला मृतांचा आकडा; तरीही ट्रम्प उचलणार ‘हे’ धोकादायक पाऊल?
"आम्हाला जास्त काही नको, पण किमान पगार द्या"; डॉक्टरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
“सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे; लोक आपोआप कामधंद्याला लागतील”