बीजिंग- चीनमध्ये एका वयोवृद्ध महिलेने शनिवारी रस्त्याच्याकडेला असणाऱ्या एका ज्योतिषाच्या दुकानाची तोडफोड केली. चीनमधील एका ज्योतिषाने त्या महिलेच्या भविष्याबद्दल सांगितलेली गोष्ट खोटी ठरल्याने महिलेने त्या ज्योतिषाच्या दुकानाची तोडफोड केली. मिनयांगमध्ये राहणारी एक 70 वर्षीय वृद्ध महिला गेल्यावर्षी तेथिल एका ज्योतिषाकडे गेली होती. त्यावेळी तुम्ही 2018 हे वर्ष पाहू शकणार नाही, असं त्या ज्योतिषाने महिलेला सांगितलं. ज्योतिषाच्या या भविष्यवाणीमुळे महिलेने अख्खं 2017 हे वर्ष भयभीतपणे संपवलं. संपूर्ण वर्षभर ती वृद्ध महिला चिंतेत होती. तसंच 2018मध्ये आपण मरणार यासाठी मनाची तयारीही ती महिला करत होती. हाँग काँगच्या साऊथ चायना मॉर्निग पोस्टने हे वृत्त दिलं आहे.
वँग असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. 'मी 2018 हे वर्ष पाहू शकणार नाही, या ज्योतिषाच्या भविष्यवाणीनंतर मी खूप घाबरले होते. 2017 हे अख्खं वर्ष मी नीट जगले ही नाही. सतत त्याच गोष्टीचा विचार करत होते, असं त्या वृद्ध महिलेने म्हंटलं. पण ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी ठरली व महिलेने 2018 या वर्षाची सुरूवातही केली. गेल्या आठवड्यात ती वृद्ध महिला पुन्हा त्या ज्योतिषाकडे गेली व तिने रागाच्या भरात त्याच्या स्टॉलची तोडफोड केली. दरम्यान, पोलिसांनी त्या ज्योतिषाला महिलेची माफी मागायला लावली.
ज्योतिषी सांगणं हे चीनमधील प्रसिद्ध व्यवसाय आहे. या ज्योतिषींचं प्रेडिक्शन व्यक्तीचं नाव, जन्मतारीख, रास व चेहरेपट्टीवर अवलंबून असतं.