Chinmoy Krishna Das arrested: बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर देशभरात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, या घटनांविरोधात आंदोलन करणारे इस्कॉनचे प्रवक्ते चिन्मय दास यांना सरकारने देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्या सुटकेची मागणी करत राजधानी ढाका आणि लगतच्या परिसरात लोक रस्त्यावर उतरले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिन्मय दास यांना काल(दि.25) दुपारी 3.30 वाजता ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आले. साध्या कपड्यातील काही लोकांनी गुप्तचर विभागाचे सदस्य असल्याचे सांगून त्यांना ताब्यात घेतले.
चिन्मय दास यांच्यावर काय आरोप आहेत?चिन्मय दास यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांना अटक करण्यात आल्याचे ढाका पोलिसांनी सांगितले आहे. दास यांच्यावर बांग्लादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप आहे. बीएनपीचे माजी नेते फिरोज खान यांनी चिन्मय दास यांच्यावर हे आरोप केले आहेत. खान यांच्या आरोपानुसार, 25 ऑक्टोबर रोजी चितगावमध्ये हिंदू समुदायाची रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी चिन्मय दास आणि इतर 18 जणांनी बांग्लादेशच्या राष्ट्रध्वजाचा अनादर केला.
कोण आहेत चिन्मय दास, का चर्चेत?चिन्मय दास चितगाव (बांग्लादेशातील दुसरे सर्वात मोठे शहर) येथील पुंडरिक धामचे नेतृत्व करतात. हिंदू समाजातील प्रमुख चेहरा असलेले दास यांना इस्कॉनचे प्रवक्ते म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे अनुयायी देशभरात पसरलेले आहेत. पुंडरिक धामदेखील बांग्लादेश इस्कॉनचा एक भाग आहे. बांग्लादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत दास यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून त्यांनी हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.
बांग्लादेशी हिंदू आणि अलीकडील हिंसाचारबांग्लादेशच्या लोकसंख्येच्या 8 टक्के हिंदू आहेत. चिन्मय दास संबंधित इस्कॉनची बांग्लादेशात 77 हून अधिक मंदिरे आहेत. सुमारे 50 हजार लोक या संस्थेशी संबंधित आहेत. गेल्या काही महिन्यांत, विशेषत: शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर बांग्लादेशात हिंदू समाजाविरुद्ध भेदभाव आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संयुक्त राष्ट्र आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी याची दखल घेतली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याचा उल्लेख केला आहे.