सीरियातील अलेप्पो शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. क्लोरीन हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अलेप्पोचे गव्हर्नर हुसेन दियाब यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींच्या संख्येत वाढ होत आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 2016 मध्ये सीरियन सैनिकांनी अलेप्पो शहराला दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त केले होते. मात्र पुन्हा अलेप्पोवर ताबा मिळवण्यासाठी दहशतवाद्यांकडून हल्ले सुरू आहेत.