इस्लामाबाद - पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे. आज पाकिस्तानमध्ये नव्या पंतप्रधानांची निवड होणार आहे. मात्र तत्पूर्वी रस्त्यावर लाखो लोक इम्रान खानच्या समर्थनार्थ उतरले आहेत. कराचीपासून लाहोरपर्यंत इम्रान खानच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत आहे. तसेच इम्रान खानला पुन्हा एकदा पंतप्रधान करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. अशाच एका सभेमध्ये चौकीदार चोर है अशा घोषणाही दिल्या गेल्या आहेत.
रविवारी रावळपिंडीमध्ये पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पार्टीचे शेख रशिद हे एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी चौकीदार चोर है अशा घोषणा दिल्या गेल्या. या घोषणा पाकिस्तानी लष्कराविरोधात दिल्या गेल्याचे बोलले जात आहे.
इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून हटवण्यामागे पाकिस्तानी लष्कर आणि लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. मात्र या सभेदरम्यान, अशा घोषणा झाल्यानंतर काही वेळाने शेख रशिद यांनी अशा घोषणा न देण्याचे आवाहन केले. त्यानंतर या सभेत सहभागी झालेली जनता शांत झाली.
पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच पाकिस्तानी जनतेमधील एक मोठा वर्ग इम्रान खान यांनाच पंतप्रधान म्हणून पाहू इच्छित आहे. सध्या पाकिस्तानमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. इस्लामाबाद, कराची, पेशावर, मालाकंद, मुल्तान, खैबर, झांग आणि क्वेटामध्ये विरोधी पक्षांविरोधात घोषणाबाजी सुरू आहे.
इम्रान खान यांनीही एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, ही ऐतिहासिक गर्दी आहे. ती बदमाशांच्या नेतृत्वाखालील इंपोर्टेड सरकारला विरोध करत आहे.