पाकिस्तानमधील फैसलाबाद येथे एका ख्रिश्चन कुटुंबावर ईशनिंदेचा आरोप करत अनेक चर्चची तोडफोड करण्यात आली. एवढंच नाही तर काही ख्रिस्ती इमारती आणि वस्त्यांचंही नुकसान करण्यात आलं. ही घटना जरनवाला येथे घडली. एका सफाई कर्मचाऱ्याने कुराणाबाबत कथितपणे आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने मुस्लिम जमाव नाराज झाला आणि त्यांनी त्या कर्मचाऱ्याच्या घरासह ख्रिस्ती समुदायाची अनेक घरे, इमारती आणि चर्चचं नुकसान करण्यात आलं.
आता संतप्त जमाव आणि तोडफोडीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं की, पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यानंतर मौलवीने जमाव गोळा करून हल्ल्यासाठी चिथावणी दिली. डॉनच्या एका वृत्तामध्ये पंजाब पोलीस प्रमुख उस्मान अन्वर यांनी सांगितले की, परिसराला घेराव घालण्यात आला असून, आंदोलकांसोबत चर्चा सुरू आहे.
मात्र ख्रिश्चन समुदायाने हल्ले होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. मुस्लिम मौलवी आणि संतप्त जमावाने आमच्या घरांची मोडतोड केली. डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी आरोपी ख्रिश्चन व्यक्तिविरोधात पाकिस्तानमधील कलम २९५बी (पवित्र कुराणला अपवित्र करणे) आणि कलम २९५सी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.