स्थलांतर हा निसर्गाचा नियम आहे, असे म्हटले जाते. कधी पोटासाठी, कधी शिक्षणासाठी तर कधी संकट काळात लोक स्थलांतर करत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. प्यू रिसर्चच्या आकडेवारीचा विचार करता, जगातील एकूण लोकसंख्येपैकी 3.6 टक्के लोक हे, ज्या देशात जन्मले त्या देशात राहत नाहीत. हा आकडा 28 कोटीच्या जवळपास जातो. प्यू रिसर्चच्या एका अहवालानुसार, दुसऱ्या देशात राहणाऱ्या लोकांचा आकडा धर्माच्या आधारे बघितल्यास, यात ख्रिश्चन धर्म पहिल्या क्रमांकावर आहे.
इतर देशांमध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांमध्ये ख्रिश्चनांची संख्या सर्वाधिक 47 टक्के एवढी आहे. तर मुस्लीम दुसऱ्या क्रमांकावर असून स्थलांतरित झालेल्यांमध्ये त्यांची संख्या 29 टक्के एवढी आहे. या बाबतीत हिंदू तिसऱ्या क्रमांकावर आहेत, केवळ 5 टक्के हिंदूच, ज्या देशात त्यांचा जन्म झाला तो देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतरित झाले आहेत. यात चौथा क्रमांक बौद्ध समाज 4 टक्के तर ज्यू 1 टक्के आहेत.
यातही मजेदार गोष्ट म्हणजे, स्थलांतरित झालेल्या लोकांपैकी 13 टक्के लोक हे स्वतःला नास्तिक म्हणवणारे आहेत. अशा लोकांचा ख्रिश्चन आणि मुस्लिमांनंतर तिसरा क्रमांक लागतो. महत्वाचे म्हणजे, या अहवालात, युद्ध, आर्थिक संकट, दुष्काळ यांसारख्या आपत्तींनाही स्थलांतराचे प्रमुख कारण मानण्यात आले आहे.
धार्मिक छळ हेदेखील स्थलांतराचे मुख्य कारण असल्याचे या अहवालात म्हणण्यात आले आहे. किंबहुना असा ट्रेंड त्या-त्या देशांतील अल्पसंख्याकांमध्ये अधिक दिसून येतो. तेथे होणाऱ्या अत्याचारांमुळे, ते लोक सर्वसामान्यपणे अशा देशांमध्ये जाऊन राहणे पसंत करतात, जेथे त्यांच्या धर्म-पंथाला मानणारे लोक बहुसंख्य असतील. अशा स्थलांतरामुळे अनेक देशांच्या लोकसंख्येमध्ये मोठे बदल झाल्याचेही या अहवालात म्हणण्यात आले आहे.