वॉशिंग्टन:अमेरिका जरी तालिबानवर वरुन-वरुन कडक भूमिका घेत असल्याचं दाखवत असला तरी आतून त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. ताज्या माहितीनुसार, सीआयएचे संचालक विल्यम जे बर्न्स यांनी काबूलमध्ये तालिबान नेता मुल्ला बरदार याची भेट घेतली आहे. सोमवारी दोघांमध्ये झालेल्या या भेटीनंतर अनेक चर्चांन उधाण आलं आहे.
अमेरिकन सैन्याची माघार सुरुच
मिळालेल्या माहितीनुसार, बरदार आणि सीआयए संचालक एका उच्चस्तरीय बैठकीत आमनेसामने आले. काबूलवर कब्जा केल्यानंतर पहिल्यांदाच अशी उच्चस्तरीय चर्चा झाली, ज्यात अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं तालिबानशी चर्चा केली आहे. पण, गुप्तचर संस्थेनं या बैठकीबाबत कोणतंही अधिकृत विधान दिलेलं नाही किंवा व्हाईट हाऊसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिकेच्या अनेक वृत्तवाहिन्यांनी या बैठकीची माहिती दिली आहे.
अमेरिकन नागरिकांच्या मुद्यावर चर्चाया भेटीनंतर असे म्हटले जात आहे की, सीआयएच्या संचालकांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्याच्या मुद्यावर तालिबान नेत्याशी चर्चा केली आहे. सध्या अनेक देशांचे नागरिक काबूल विमानतळावर अडकले असून, मायदेशात परत जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. भारत, अमेरिकेसह अनेक देशांनी अफगाणिस्तानमधून नागरिकांना बाहेर काढलं आहे.दरम्यान, तालिबाननं अमेरिकेला 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून आपलं सैन्य माघारी घेण्याची मूदत दिली आहे.