वॉशिंग्टन - उत्तर कोरिया आपल्यावर अण्वस्त्र हल्ला करेल अशी भिती अमेरिकेला वाटत आहे. अमेरिकेपर्यंत पल्ला असलेली अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाच्या ताफ्यात असू शकतात असे अमेरिकेला वाटते. अमेरिकेला त्याचीच चिंता लागून राहिली आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख माईक पॉम्पिओ यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली.
उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उनपासून असणा-या धोक्याविषयी आमच्या गुप्तचरयंत्रणेमध्ये नेहमी चर्चा होत असते असे पॉम्पिओ यांनी सांगितले. पुढच्या काही महिन्यात उत्तर कोरिया अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करेल का ? त्याविषयी आमची चर्चा होते. उत्तर कोरियाच्या संभाव्य हालचालींविषयी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांपर्यंत अचूक गुप्तचर माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. जेणेकरुन या संकटाचा समर्थपणे सामना करता येईल असे पॉम्पिओ यांनी सांगितले.
उत्तर कोरियाच्या विरोधात सैन्यबळाचा वापर केल्यास मोठया प्रमाणावर जिवीतहानी होईल असे पॉम्पिओ म्हणाले. किमला हटवणे किंवा त्याला अमेरिकेविरोधात अण्वस्त्राचा वापर करण्यापासून कसे रोखायचे यावर विचार केल्यास अनेक गोष्टी शक्य आहेत असे ते म्हणाले. उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जापान संयुक्तपणे युद्धसराव करत असतात. मागच्या महिन्यातही अशाच प्रकारचा युद्धासराव झाला.
अमेरिकेच्या विमानांनी गुआम येईल हवाईहद्दीतून उड्डाण केले होते. या संयुक्त सरावामध्ये अमेरिकेची एफ-२२ आणि एफ-३५ स्टील्थ फायटर विमाने सहभागी झाली होती. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर हा युद्धसराव करण्यात येत आहे. उत्तर कोरियाने वॉसाँग-15 या आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचे फोटो प्रसिद्ध करून अमेरिकेच्या कुठल्याही शहरावर हल्ला करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम असल्याचा दावाही केला होता. उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाच्या वर्तमानपत्रात हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. फोटो प्रसिद्ध होताच अमेरिकेसह उत्तर कोरियाच्या विरोधात असणा-या देशांच्या शास्त्रज्ञांनी हे क्षेपणास्त्र किती घातक ठरु शकते त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. तज्ञांच्या म्हणण्यानुसार वॉसाँग-15 हे यापूर्वीच्या क्षेपणास्त्राच्या तुलनेत आकाराने मोठे आणि टेक्नोलॉजीमध्ये अधिक सरस आहे. उत्तर कोरियाने ही चाचणी करताना आपल्याच देशात बनवलेल्या मोबाइल लाँचरचा उपयोग केला. शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या रेंजबद्दल मात्र शंका उपस्थित केली आहे.