वॉशिंग्टन : कोरोना साथीने हाहाकार माजविलेल्या अमेरिकेमध्ये आगामी दोन आठवडे अत्यंत वेदनादायी असण्याची शक्यता आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात असूनही अमेरिकेमध्ये कोरोनामुळे भविष्यात एक लाख ते दोन लाख चाळीस हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा ट्रम्प सरकारने नुकताच दिला होता.
ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले, की अमेरिकेत अत्यावश्यक सेवा वगळून बाकीचे सारे व्यवहार व वाहतूक बंद ठेवण्याचा सरकारने घेतलेला निर्णय योग्यच होता, हे सध्याच्या घडामोडींवरून सिद्ध होत आहे. येत्या दोन आठवड्यांत आणखी विपरित परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक अमेरिकी नागरिकाने सज्ज राहावे. हा कालावधी अत्यंत वेदनादायी असणार आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या ३८०० वर पोहोचली आहे.
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्या देशात कोरोनाच्या चाचणीसाठी आवश्यक असलेले संच, वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे. या स्थितीबद्दल ट्रम्प सरकावर जोरदार टीका होत आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करूनही अमेरिकेत या साथीच्या बळींमध्ये मोठी वाढ होणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. हा आजार बरा करण्यासाठी कोणताही जादूचा उपाय किंवा रामबाण औषध उपलब्ध नाही. या संकटाचा अतिशय काळजी घेऊन व निर्धारानेच मुकाबला करावा लागेल, असे या तज्ज्ञांनी सांगितले. उपायांना येणार महिनाभराने यश?नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन या संस्थेचे प्रमुख डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले, की कोरोनामुळे अमेरिकेत बळींचा आकडा वाढत असला तरी हे प्रमाण कमी करण्यासाठी अमेरिका सरकारने उचललेल्या पावलांना आगामी ३० दिवसांत नक्कीच यश येईल. अमेरिकेतील परिस्थिती गंभीर असल्याचे तज्ज्ञांनी वारंवार सांगूनही येत्या इस्टरपर्यंत देशातील आर्थिक व्यवहार पूर्ववत सुरू करण्याचा मानस डोनाल्ड ट्रम्प यांनी बाळगला होता. पण आता त्यांनी हा विचार दूर सारला असून अमेरिकेतील निर्बंधांची मुदत आणखी महिनाभराने नुकतीच वाढविली होती.