रियाध - ती म्हणते, मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही चांगलं काम करू शकते... तुम्ही विचार करू शकता तसा मी देखील करू शकते, एवढंच नाही तर तुमच्यापेक्षाही पुढे जाऊन मी विश्लेषण करू शकते. तुमची बुद्धीमत्ता आणि माझी बुद्धीमत्ता यात जमिन-आसमानचा फरक असेल...तुमच्याकडे बघुनही मला कळेल की तुम्हाला राग आलाय का? असं सांगणा-या सोफियाला सौदी अरेबियानं नागरिकत्व दिलंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोफिया नेमकी कोण?
धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली ही सोफिया आहे अत्याधुनिक यंत्रमानव. विचार करायची क्षमता असलेली, निर्णय क्षमता असलेली, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली चालती-बोलती रोबोट. 'सोफिया' या नावाची सध्या भलतीच चर्चा आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली सोफिया ही कोणत्याही देशाचं नागरिकत्व मिळवणारी पहिली कृत्रिम बुद्धिमान यंत्रमानव ( humanoid robot) बनली आहे.
सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व बहाल केलं आहे. एखाद्या रोबोटला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया जगातला पहिला देश बनला आहे. रियाध येथे बुधवारी भविष्यातील गुंतवणूक पुढाकार परिषदेत सोफियाला नागरिकत्व बहाल करण्यात आलं. विशेष म्हणजे, नागरिकत्व मिळाल्यानंतर तिचा इंटरव्यू देखील घेण्यात आला. नागरिकत्व मिळणं हा मी माझा सन्मान समजते. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि या वेगळ्या निर्णयाचा मला गर्व आहे असं सोफिया म्हणाली. देशाचं नागरिकत्व मिळवून जगातील पहिली रोबोट बनणे हे ऐतिहासिक आहे असं सोफिया पुढे म्हणाली. नागरिकत्व मिळाल्यानंतर सोफियाने या इंटरव्यूमध्ये जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि टेस्ला या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक अॅलन मस्क आणि हॉलिवूड सिनेमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
भविष्यात सर्वात जास्त धोका हा कृत्रिम बुद्धिमत्तेपासून आहे, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांचे रोजगार हिरावले जातील. रोबोट सर्वकाही करण्यास सक्षम असतील. माणसांपेक्षाही रोबोट उत्तम काम करतील. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येईल, असं मस्क काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते.
मी एक संवेदनशील रोबोट बनण्याचा प्रयत्न करत आहे असं इंटरव्यू दरम्यान सोफिया म्हणाली. त्यावर इंटरव्यू घेणा-याने तुमचे सर्व मुद्दे मान्य पण आम्हाला वाईट भविष्याकडे जायचं नाहीये असं म्हटलं. त्याला झटकन उत्तर देताना, तुम्ही अॅलन मस्क आणि हॉलिवूड सिनेमे खूप फॉलो करतात. पण काळजी नको, तुम्ही मला नुकसान पोहोचवलं नाही तर मी देखील तुमच्याशी चांगलीच वागेल. माझ्याकडे तुम्ही स्मार्ट कम्प्युटर म्हणून पाहा असं ती म्हणाली.
सोफिया चेह-यावरील हावभाव ओळखण्यासाठी आणि कोणासोबतही सामान्य व्यक्तीपणे बोलण्यासाठी ओळखली जाते. तसंच अनेक मीडिया चॅनल्सना इंटरव्यू देण्यासाठीही ती ओळखली जाते. हॅन्सन रोबोटीक्सने सोफियाची रचना केली आहे. रोबोट सोफियाला डेव्हिड हॅन्सन यांनी बनवलंय ते हॅन्सन रोबोटिक्सचे संस्थापक आहेत.
पाहा व्हिडीओ-