ओस्लो : मृत्यूचा काही नेम नसतो. कुठे, कधी आणि कशी त्याच्याशी गाठ पडेल कोणी सांगू शकत नाही. मृत्यूला कोणीही रोखू शकत नाही; परंतु एका शहरात मरणावर बंदी आहे. अजब वाटले असेल; परंतु नॉर्वेतील लॉन्गेयरबेन शहरात खरच मृत्यूवर बंदी आहे. या बंदीमागील कारण जर ऐकले तर तुम्हीही या अजब बंदीचे समर्थन कराल. दोन हजार लोकसंख्येच्या या गावात नेहमीच गोठवून टाकणारी थंडी असते. येथे राहणारे लोक एकतर पर्यटक आहेत किंवा संशोधक शास्त्रज्ञ. येथे चोहीकडे बर्फच बर्फ असतो. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीसाठी केवळ स्नो स्कूटरचा उपयोग केला जातो. वर्षातील चार महिने सूर्य उगवत नाही. त्यामुळे २४ तास रात्रच असते. शहरात खूपच छोटी स्मशानभूमी असून, तेथे गेल्या ७० वर्षांत एकालाही दफन करण्यात आलेले नाही. प्रचंड थंडी आणि बर्फात दबल्यामुळे येथे मृतदेह मातीत मिसळतच नाही. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी येथील स्मशानभूमीतून मृतदेहाच्या पेशीचे नमुने घेतले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यात इन्फ्लुएंझा अर्थात शीतज्वराचे विषाणू आढळून आले, तेव्हापासून येथे ‘नो डेथ पॉलिसी’ लागू करण्यात आली. त्यामुळेच येथे कोणी गंभीर आजारी पडून मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचल्यास त्याला विमानाने किंवा जहाजाद्वारे नॉर्वेच्या दुसऱ्या भागात पाठविले जाते.
या शहरात माणसांना मरण्याची नाही मुभा
By admin | Published: February 09, 2017 1:51 AM