इस्लामाबाद : गव्हाचे पीठ आणि विजेच्या चढ्या दराविरोधात पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पेटले असून, आंदोलन करणारे नागरिक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत एक पोलिस अधिकारी ठार झाला आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
पीओकेमध्ये शनिवारी पोलिस आणि आंदोलकांत चकमक झाल्याचे व सर्वत्र बंद पुकारल्याचे वृत्त डॉन वृत्तपत्राने दिले. मिरपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक कामरान अली सांगितले की, जम्मू काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीच्या नेतृत्वात मुझफ्फराबादकडे निघालेला मोर्चा रोखण्यासाठी उपनिरीक्षक अदनान कुरेशी यांच्या नेतृत्वात इस्लामगढमध्ये बंदोबस्त तैनात केला होता. तेथील झालेल्या चकमकीत छातीत गोळी लागल्याने कुरेशी यांचा मृत्यू झाला.
राष्ट्राध्यक्षांची तातडीने बैठक
पीओकेतील परिस्थितीवर ताेडगा काढण्यासाठी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.
पोलिसांवर दगडफेक व बाटल्यांनी हल्ला
मागील बुधवारी आणि गुरुवारी जेएएसीच्या सुमारे ७० कार्यकर्त्यांना पोलिसांनी मुझफ्फराबाद आणि मीरपूर विभागात छापे टाकून अटक केली. गुरुवारी दड्यालमध्ये गंभीर संघर्ष सुरू झाला. जम्मू काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीने शनिवारी मुझफ्फराबादच्या दिशेने नियोजित ‘लाँग मार्च’च्या एक दिवस अगोदर शुक्रवारी बंद आणि चक्काजामची घोषणा केली. बंददरम्यान पीओकेची राजधानी मुझफ्फराबादमध्ये पोलिस व आंदोलकांमध्ये चकमक झाली. मुझफ्फराबाद आणि पूंछ विभागात कडकडीत बंद पाळला गेला. आंदोलकांनी दगड आणि बाटल्या फेकल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला. या धुमश्चक्रीत किमान ७८ पोलिस जखमी झाले, तर एकूण २९ आंदोलक जखमी झाले आहेत.