बीजिंग : गौतम बुद्धांचा जगातील सर्वात उंच पुतळा चीनमधील सिचुआन प्रांतातील लेशान येथे आहे. त्याच्या दुरुस्तीसाठीचे काम हाती घेण्याच्या दृष्टीने येत्या आठ आॅक्टोबरपासून पुढचे चार महिने या पुतळ्याची शास्त्रीय दृष्टीतून पाहणी करण्यात येणार आहे.
७१ मीटर उंचीचा असलेल्या या पुतळ्याच्या छाती तसेच पोटाच्या भागावर तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. ३डी स्कॅनिंग, इन्फ्रारेड थर्मल इमेजिंग तसेच ड्रोन एरियल सर्व्हेचा वापर या पाहणीसाठी केला जाईल. अनेक पुरातत्व शास्त्रज्ञ या कामात गुंतलेले आहेत. चीनमधील तांग राजवटीच्या काळात लेशान शहराजवळील एका डोंगरातील कातळ खोदून हा भव्य पुतळा साकारण्यास इसवी सन ७१३ मध्ये सुरुवात झाली. तो पूर्ण होण्यास तब्बल ९० वर्षे लागली.जागतिक सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या या पुतळ्याची दुरुस्ती करणे आता आवश्यक झाले आहे. या पुतळ्याची साफसफाई करण्याचा एक प्रकल्प चीनने २००१ साली राबविला होता. त्यासाठी २५ कोटी युआन खर्च करण्यात आले होते. आम्लयुक्त पाऊस व अन्य कारणांनी या पुतळ्याचे नुकसान झाल्याने २००७ सालीही त्याची दुरुस्ती करण्यात आली होती.