इस्लामाबाद : पाकिस्तानात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नुकताच कोरोनाने एका क्रिकेटरचाही बळी घेतला. मात्र, असे असतानाच येथील काही कट्टरपंथी मौलवींनी सरकारने मशिदींमध्ये सामूहिकपणे नमाज पठणावरील बंदी वाढविण्याची चूक करू नये, असे म्हटले आहे. येथील द डॉन या वृत्त पत्राने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, 'वक्फकुल मदरिस अल अरेबिया'शी संबंधित 50 हून अधिक मौलवींनी, कोरोना व्हायरसची भीती दाखवून बंदी पुढे वाढवू नये, असा इशारा पाकिस्तान सरकारला दिला आहे. हे सर्व मौलवी रावलपिंडी आणि इस्लामाबादमधील आहेत.
द डॉन वृत्तपत्रातील वृत्तानुसार, या सर्व मौलवींनी इस्लामाबाद येथील 'जामिया दारुल उलूम जकारिया'मध्ये एक बैठक घेतली होती. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठणावर घातलेल्या बंदीसदर्भात सरकारला इशारा देण्यासंदर्भात एकमत झाले. यावेळी, या संघटनेशी संबंधित वरिष्ठ मौलवींशिवाय बंदी असलेली संघटा 'अहले सुन्नत वल जमात'चेही सदस्य उपस्थित होते. काही दिवसांतच इस्लामचा महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यालाही सुरू होत आहे. तसेच अम्हाला कुणाशीही संघर्ष करण्याची इच्छा नाही, असे बैठकीनंतर, जामिया दारुल उलूम जकारियाचे अध्यक्ष पीर अजिजुर रहमान हजारवी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानात काही मौलवींना नियमांचे उलंघण केल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावर नाराजी दर्शवत, त्यांच्यावरील गुन्हेही मागे घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पाकिस्तानात सध्या कोरोना बाधितांची संख्या 5707वर
पाकिस्तानात सध्या कोरोना बाधितांची संख्या 5707वर पोहोचली आहे. येथील सिंध आणि पंजाब या दोन प्रांतांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एकट्या पंजाबमध्ये कोरोना बाधितांचा आकडा 2826 एवढा आहे, तर सिंधमध्ये 1452 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय खैबर पख्तून्ख्वांमध्ये 800, बलूचिस्तानात 231, गिलगिट बाल्टिस्तानमध्ये 224, इस्लामाबादमध्ये 131 तर गुलाम कश्मीरमध्ये 43 जण आतापर्यंत आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पाकिस्तानात 96 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल आहे. तसेच 1092 रुग्ण बरेही झाले आहेत.